दुखापत… दुखापत आणि दुखापतच: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघ दुखापतीने ग्रस्त

0
360

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पुढील काळात दुखापतींचा दौरा म्हणून ओळखला जाणार आहे. कारण या दौऱ्यात आणि दौऱ्यापूर्वी गेल्या दोन महिन्यात भारताचे तब्बल 12 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. दुखापतीमुळे जलदगती गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी कसोटी मालिका खेळू शकले नाहीत. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने जलदगती गोलंदाज उमेश यादवदेखील मायदेशी परतला. त्यामुळे टीम इंडियाच्या जलदगती गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर होती. त्याला नवोदित गोलंदाज मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी या दोघांची साथ मिळाली. परंतु तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्याने आता जसप्रीत बुमराहदेखील चौथ्या कसोटी सामन्याला मुकणार असल्याचे बोलले जात आहे. जाडेजाच्या अंगठ्याला फ्रॅक्चरमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून तो बाहेर पडला आहे

तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम ११ जणांची निवड करण्यात येणार आहे.

चौथ्या कसोटीत भारतापुढील आव्हानं आणखीनच कठीण आहेत. कारण दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये जाडेजा, बुमराह आणि हनुमा विहारी यांची भर पडली आहे. त्यात अश्विन आणि मयांक अग्रवाल यांच्या खेळण्यावरही संभ्रम आहे. ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील इतके खेळाडू दुखापतग्रस्त झालेत की चौथ्या कसोटीत खेळण्यासाठी अंतिम ११ खेळाडूच नाहीत. अशा परिस्थितीतही भारतीय संघानं केलेली कामगिरी विसरता येणार नाही. त्यांची लढाऊ वृत्ती खरंच कौतुकास्पद आणि आदर्शवत आहे. इतर संघ अडचणीत आणि कठीण प्रसंगात असताना या भारतीय संघाचा नक्कीच आदर्श घेतील अशी कामगिरी अंजिक्य रहाणे आणि कंपनीनं करुन दाखवली आहे.