जानेवारीत येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रांत. या दिवशी एकमेकांना तिळगूळ देऊन वर्षभर गोड बोलण्यास सांगण्यात येतं. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी भोगीची भाजी केली जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रातीचा सण साजरा केला जातो. आपल्यापैकी बऱ्याच जणांना भोगीच्या सणाबद्दल जास्त माहिती नाही. तो का साजरा करतात? कसा साजरा करतात? या बद्दलही फारच कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया भोगी सणाबद्दल…
असे मानले जाते की, संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते. त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो. यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते
मकर संक्रात कशी साजरी केली जाते?
संक्रात हा एक सामुदायिक सण आहे, या दिवशी लोक रंगीबेरंगी सजावट करतात. पहिल्या काळात संक्रांतीच्या दिवशी ग्रामीण भागात लहान मुले गाणी गात घरोघरी जात असत आणि मिठाई मागत असत. संक्रांतीच्या दिवशी गावच्या जत्रा भरत असत. तसेच या दिवशी घरोघरी मेजवानी असायची, लोक पतंग उडवत असत. वेळेनुसार या सणाचे रूप बदलत चालले आहे, आजकाल मकर संक्रांति हा सण स्त्रियांचा सण बनून राहिला आहे.
प्रत्येक बारा वर्षांनी मकर संक्रांतीच्या दिवशी कुंभमेळा भरतो. ज्यामध्ये लाखो लोक पवित्र नदी मध्ये अंघोळ करून सूर्याला नमन करून आपले पाप धुऊन टाकतात. कुंभमेळा ची प्रथा आधी शंकराचार्य यांनी सुरू केली होती.
मकर संक्रांतीचे महत्व
मकर संक्रांति हा सण सूर्य देवता ला समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाचे खूप महत्त्व आहे, याचे वर्णन वेदांमध्ये सुद्धा केले आहे (गायत्री मंत्र). यादिवशी उत्तरायण चालू होते, हा सहा महिन्याचा काळ हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो. मकर संक्रातीचे अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे म्हणून लोक या दिवशी पवित्र नद्या जसे की गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांमध्ये आंघोळ करतात. या पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते.
भारतामध्ये मकर संक्रातीला जरी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तरी एक प्रथा आहे जी सर्व प्रदेशांमध्ये समान आहे. ही समान प्रथा म्हणजे तिळगुळ होय. प्रत्येक प्रदेशात या दिवशी तीळ आणि गूळ यापासून प्रसाद बनवला जातो आणि ते कुटूंबातील सदस्यांमध्ये, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना वाटले जाते. तिळगुळ हे वेगवेगळे असूनही शांततेत व आनंदात एकत्र राहण्याचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रामध्ये तिळगुळ वाटताना ” तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे बोलण्याची प्रथा आहे.
मकर संक्रांतीचे वैज्ञानिक कारण म्हणजे सूर्य उत्तरायण झाल्याने प्रकृती मध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या लोकांना सूर्यदेवाच्या उत्तरायण होण्याने थंडीपासून बचाव होण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. मकर संक्रांती अशा काळात येते जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणी करून खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद घरी घेऊन येतात. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला खरीप हंगामातील पदार्थांनी या पर्वाचे स्वागत केले जाते.
स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवतात, ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रामध्ये आहे. हळदीकुंकू समारंभात गावातील स्त्रिया एका ठिकाणी जमा होतात, या कार्यक्रमासाठी त्या महाराष्ट्रीयन पेहरावात नटून-थटून येतात. एकमेकांना हळदी कुंकू लावून हा कार्यक्रम साजरा केला जातो. तसेच यावेळी स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देतात. भारताच्या खूप साऱ्या प्रांतांमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी रब्बी पिकाची सुरुवात असते. या काळात शेतातील पेरणी झालेली असते आणि अवघड कामे संपलेली असतात मग या वेळी लोक एकत्र येतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, गुरांची काळजी घेतात, एकत्र पतंग उडवणे असे सामूहिक कार्यक्रम करतात.