काय आहे पतंगाचा इतिहास? संक्रांतला पतंग उडवण्यामागचे कारण काय आहे?

0
833

मकर संक्रात आली की आकाशात वेगवेगळ्या रंगांचे आणि आकारांचे पतंग दिसतात. तुम्ही मित्रांसोबत पतंग उडवत असालच. उडवली नाहीत तरी दादासोबत पतंगाची कन्नी बांधणे, मांज्याची फिरकी घेऊन उभं राहण्याची मजा अनुभवली असेल. शाळेतही मकार संक्रांत आली की, चित्रकलेला पतंग उडवणा-या मुलांचं चित्र काढा, घरी पतंग बनवून आणा किंवा मराठी विषयात पतंगाचं आत्मवृत्त लिहून आणा, असा स्वाध्याय द्यायला सुरुवात होते. पण पंतग कोणी बरं शोधला असेल हा प्रश्नही आपल्याला नेहमी पडत असतो नाही का…?

पतंगाचा इतिहास:

  • पतंगाचा शोध प्राचीन आहे. पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला असे उल्लेख आढळतात. बेंजामिन फ्रॅन्कलिन या शास्त्रज्ञाने ढगांमध्ये विद्युत उर्जा असतात हे पतंगाच्या दोराला धातूच्या तारा बांधून सिद्ध केले होते. पतंगाला तब्बल २००० वर्षाचा इतिहास आहे. कागदाचाही शोध लागला नव्हता तेव्हापासून पतंग उडवले जात. पहिला पतंग चीनमध्ये तयार झाला की नाही यावरून तज्ज्ञांत मतभेद आहेत, पण चीनमध्येच पहिला पतंग तयार झाला असावा, असं बहुतेक जण समजतात. कारण त्या काळात पतंग तयार करण्यासाठी लागणारं रेशमी कापड, पतंगाला आधार देणारा बांबू आणि मजबूत रेशमी धागा हे सर्व चीनमध्ये उपलब्ध होतं. अर्थात, काही जणांचं असं म्हणणं आहे की, पतंग मलेशियन किंवा इंडोनेशियन लोकांनी तयार केला असावा. तिथले लोक झाडांच्या मोठमोठय़ा पानांपासून तयार केलेले पतंग उडवायचे. पहिला पतंग असाच झाडांच्या पानांपासून बनवलेला होता.
  • भारतात पतंगाचा इतिहास मुघल काळातला असल्याचे आढळते. त्या वेळच्या चित्रात काही व्यक्ती प्रेमसंदेश पाठवण्यासाठी पतंग वापरत असत, असे तेव्हाच्या चित्रांवरून दिसते.
  • विशेष असे कि, पहिल्या महायुद्धात पतंगांचा वापर हा शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केला गेला असे दिसून येते. अठराव्या शतकात त्यांचा वापर संशोधनासाठी केला गेला. बेंजामिन फ्रँकलिन, अ‍ॅलेक्झांडर विल्सन यांनी हवामानाच्या अभ्यासासाठी त्याचा वापर केला, तर राईटबंधू यांनी त्याचा वापर करून पुढे विमानाचा शोध लावला. विल्यम एडी व लॉरेन हारग्रेव्ह यांनी हवामानाचा अभ्यास त्याच्या मदतीने केला.

पतंग कसा उडवितात?

पतंग पातळ ताव व बांबूच्या कामट्या वापरुन बनवितात.ह्याला दोऱ्याच्या सहायाने आकाशात उडविले जाते. पतंग उडविताना मांजाची चक्री धरण्यास एक व पतंगाला ढील देण्यास एक, अश्या दोन व्यक्ती लागतात. पतंगाची दोरी म्हणजेच ‘मांजा’काचेचा (वस्त्रगाळ) भुगा आणि शिजवलेल्या भातात घोळवला जातो. यामुळे तो कडक बनतो व इतर पतंग काटू शकतो. बारीक असलेला बरेली मांजा उत्कृष्ट मानला जातो. पतंग हा एक पंखच आहे. पतंगाला दोन समान भाग असतात. हे भाग सारख्या आकाराचे असल्याने पतंग समतोल बनतो. पतंगाच्या काड्या, शेपूट व आकार यावर पतंग कसा उडेल हे ठरते. पतंग हवेमुळे वर आकाशात जातो. वाऱ्याचा वेग मर्यादित स्वरूपात असेल तर पतंग चांगले उडतात.

पतंगाचे उपयोग?

संदेश पाठवणे हवामानाचा अभ्यास करणे ते माणसांची वाहतूक करण्याचे प्रयत्न या सर्वांसाठी पतंगांचा उपयोग झाला आहे. बोअर युद्धात टेहळणीसाठी आणि माणसांना वाहून नेण्याकरिता पतंगांचा उपयोग करण्यात आला होता. इतिहासात शत्रुसैन्याला घाबरवण्यासाठी पतंगांचा वापर केला गेला. मोठ्या पतंगाचा उपयोग त्यावर काही सामाजिक जागरूकतेचे संदेश, घोषणा, राजकीय पक्षाच्या प्रचाराशी संबंधित माहितीसाठीही केला जातो.

मकरसंक्रांतला पतंग उडविण्याचे कारण

प्रत्येक सण आणि उत्सवाला धार्मिक महत्त्वासोबत त्यामागे शास्त्रीय कारणं देखील असतात.संक्रांतीच्या काळात वातावरणात थंडी असते. थंडी आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन येते असं म्हणतात. थंडीत ऊन कमी असल्यामुळे आपसुकच स्थूलपणा जाणवतो. त्यामुळेच शरीराची हालचाल व्हावी आणि सूर्याची किरणं अंगावर पडावीत यासाठी पतंग उडवला जातो, असं म्हणतात.

संक्रांतीला सूर्य मकर रासीत प्रवेश करतो. सूर्य़ाचे उत्तरायण सुरू होते. या काळात सूर्याची किरण अंगावर पडली की त्याचा शरीराला फायदा होतो. त्वचा निरोगी आणि तजेलदार राहण्यासाठी सूर्यकिरणं आवश्यक असतात. पतंग उडवताना आपलं लक्ष आकाशातील पतंगाकडे राहतं आणि शरीराची हालचालही होते.