भारताचा 2-1 ने मालिकेवर ताबा: भारतीय संघाने रचला इतिहास; गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण

0
252

टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला 7 विकेट्सनी पराभूत इतिहास रचला. भारताने ऑस्ट्रेलियात आपले सर्वात मोठे 328 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि चौथा कसोटी सामना जिंकून मालिका 2-1 ने खिशात घातली. याआधी भारताने 2003 च्या एडिलेट कसोटीत 233 धावांचे सर्वात मोठे लक्ष्य पार केले होते. या कसोटीत सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (91), अनुभवी चेतेश्वर पुजारा (56) आणि तुफानी ऋषभ पंत (85 नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ही कसोटी जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे.

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या आणि अखरेच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाला. सामन्याच्या अखेरच्या दिवशी 328 धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने ऑस्ट्रेलियाचा 3 विकेट्सनी दणदणीत पराभव केला. मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक कसोटी सामना जिंकून भारताने कसोटी मालिकाही 2-1 अशा फरकाने खिशात घातली. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे गाबाच्या मैदानावर आतापर्यंत 250 पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य कोणत्याही संघाला गाठता आलं नव्हतं. भारतीय संघाने इतिहास घडवला आणि वेस्ट इंडिजचा 70 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.

अॅडलेड कसोटीमधील लाजिरवाणा पराभव ते मालिका विजय, भारताचा हा विजय निश्चितच थक्क करणारा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडलेडमधील पहिल्या कसोटीत भारताचा संपूर्ण संघ 36 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे भारतात परतला आणि संघाचं नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं. मेलबर्न कसोटीत भारताने दमदार कमबॅक केलं. त्यानंतरची सिडनी कसोटी भारताने ड्रॉ केली. हा सामना अनिर्णित राहिला तरी भारतासाठी विजयापेक्षा कमी नव्हता. मग अखेरच्या ब्रिस्बेन कसोटीत सामना दोन्ही संघाच्या बाजूने झुकत होता. 328 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताने सुरुवातीला बचावात्मक खेळ केला. त्यामुळे भारता हा कसोटी सामना ड्रॉ करण्याच्या प्रयत्नात असल्याचंच चित्र होतं. परंतु शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, वॉशिंग्टन सुंदर यांच्या खेळीमुळे सामन्याचं चित्र पालटलं आणि हा सामना तीन विकेट्सनी जिंकला.

शार्दुल ठाकूर ,मोहम्मद सिराज तसेच शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांनी भारतीय क्रिकेट संघाचे भविष्य किती चांगले आहे हे त्यांच्या कामगिरीमधून दाखवून दिले.

गाबामध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचं गर्वहरण
ऑस्ट्रेलियन संघासाठी ब्रिस्बेनचं गाबा मैदान एखाद्या किल्ल्यापेक्षा कमी नाही. ऑस्ट्रेलियाला त्या मैदानात पराभूत करणं अशक्य असल्याचं म्हटलं जातं होतं. कारण 1988 पासून ऑस्ट्रेलियाचा संघ या मैदानात कधीही पराभूत झालेला नव्हता. शिवाय सुरुवातीला क्वॉरन्टीनमुळे जेव्हा भारतीय संघाने इथे खेळण्यास नकार दिला होता, त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूंनी म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलियाची ब्रिस्बेनमधली कामगिरी शानदार आहे, त्यामुळेच भारतीय संघाला इथे खेळायचं नाही. परंतु रहाणेच्या नेतृत्त्वातील भारताच्या युवा संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांची ‘घमेंड’ उतरवली.

आजच्या सामन्याआधी गाबामध्ये ऑस्ट्रेलियाचा शेवटचा पराभव नोव्हेंबर 1988 मध्ये झाला होता. विव रिचर्ड्स यांच्या वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सनी पराभव केला होता. त्यानंतर गाबाच्या मैदानात 31 कसोटी सामने खेळवण्यात आले. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 24 सामन्यात विजय मिळवला आणि 7 सामने अनिर्णित राहिले. परंतु 19 जानेवारी 2021 हा दिवस ऑस्ट्रेलियाच्या गर्वहरणाचा ठरला.