तुरूंगातील जीवनाविषयी ऐकायला आणि बघायला मिळतं. सिनेमा आणि मालिकांमधून तुरूंगातील जीवन पडद्यावर दिसतं. मात्र, प्रत्यक्षात तुरूंग बघायचा असेल, तर तशी सोय आतापर्यंत नव्हती. राज्य सरकारने याचं दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलं असून, तुरूंग पर्यटन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारने वेगळा प्रयोग करण्याचा ठरवलं आहे. येरवडा कारागृहात ‘जेल पर्यटन’ सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांना कारागृह जवळून पाहता येणार आहेत. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. राज्यात ६० तुरूंग आहे. जवळपास २४ हजार कैदी या तुरूंगात आहेत. ३ हजार कैदी तात्पुरत्या तुरूंगात आहेत. जेल पर्यटनाची सुरूवात आम्ही करत आहोत. त्याला विद्यार्थी व नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. २६ जानेवारीपासून याची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिद्वारे यांचं उद्घाटन करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आपण स्वतः गोंदियातून या कार्यक्रमाला हजर राहणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
पर्यटकांना माहिती देण्यासाठी पर्यटन गाईड पुरविला जाईल. दररोज भेट देण्याऱ्या पर्यटकांची संख्या 50 पेक्षा जास्त असणार नाही. येरवडा कारागृहास पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांच्या संस्थेच्या लेटरहेडवर अर्ज करताना पर्यटक म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची नावे व मूलभूत तपशील याचा उल्लेख करणे आवश्यक राहिल. येरवडा कारागृह हे पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. तसेच ही योजना लवकरच महाराष्ट्रातील इतर कारागृहातही राबविण्यात येईल.
तुरूंगात घडलेल्या ज्या ऐतिहासिक घटना आहे. त्या नागरिकांना बघता येणार आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबंडेकर यांच्यामध्ये जिथे पुणे करार झाला, ती जागा व्यवस्थित आहे. ज्या बराकीमध्ये महात्मा गांधींना ठेवलं होतं. तोही व्यवस्थित आहे. मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवण्यात आलेले सेल आहेत. ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना बघता येणार आहे. त्यानिमित्ताने इतिहासाबद्दल संशोधन करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल. येरवडा जेलपासून याची सुरूवात झाल्यानंतर राज्यातील इतर तुरूंगात पर्यटन योजना सुरू केली जाईल, असं देशमुख यांनी सांगितलं.