इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला होणार आहे. हा लिलाव चेन्नईमध्ये होणार असल्याची माहिती आयपीएलच्या ऑफिशियल ट्वीटर हँडलवरुन देण्यात आली आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी खेळाडूंची बोली लावण्यात येणार आहे. आयपीएलने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “18 फेब्रुवारीला आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव चेन्नईत होणार आहे. यावर्षी आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावाबद्दल आपण किती रोमांचित आहात?
हा लिलाव 18 तारखेला ठेवण्यात आला आहे कारण इंग्लंडविरुद्धच्या मालिकेचा दुसरा कसोटी सामना चेन्नईमध्ये 17 फेब्रुवारीला संपणार आहे. चेन्नईमध्ये भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन कसोटी सामने खेळणार आहे. दुसरी कसोटी 13 ते 17 फेब्रुवारीदरम्यान होणार असून त्याच्या दुसर्याच दिवशी आयपीएलच्या लिलावासाठी टेबल सजणार आहे.
जे भारतीय खेळाडू करारमुक्त झाले आहेत आणि ज्यांना पुढील हंगामात IPLमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा खेळाडूंनी ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. मूळ फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे १२ फेब्रुवारीपर्यंत पोस्टाने पाठवली तरीही चालणार आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.
IPL 2021चे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा हंगाम ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत रंगण्याची शक्यता आहे. लिलाव पार पडल्यानंतर IPLच्या यंदाच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.