अखेर सर्वांसाठी धावणार मुंबईची ‘लाइफलाइन’; 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सुरु

0
221

अखेर मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 1 फेब्रुवारीपासून मुंबई लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचं, राज्य सरकारनं सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी राज्य सरकारनं दिली होती. पण सर्वसामान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली नव्हती. आता मात्र गर्दी होणार नाही अशा वेळा आखून मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी सर्वसामान्यांना देण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे लोकलसेवा सुरू होणार आहे. शिवाय मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये तसंच आस्थापनांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणेकरून कोरोनाच्या या स्थितीतही सर्वांच्या सुविधेने प्रवास होईल, असे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही आणि आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे.

कधी प्रवास करता येईल

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

कधी प्रवास करता येणार नाही

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेतून प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरु करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई आणि उपनगर परिसरातील कार्यालये आणि आस्थापनांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा अशी विनंती देखील मुख्य सचिव यांच्या या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.

याबाबतची सूचना मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देखील कळविण्यात आली आहे.

उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा

मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची 30 टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.