राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ असलेले सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गाव

0
876

राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ असलेले सुरगाणा तालुक्यातील भिंतघर गाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महिला सक्षमीकरणाचा अनोखा संदेश देणाऱ्या या गावाचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. एक अख्खं गाव गुलाबी (Pink village) रंगात रंगलंय. अतिशय दुर्गम भागातलं हे गाव. जिथे काही वर्षांपूर्वी विकास म्हणजे काय हे माहीतही नव्हतं. पण गावात एका शिक्षकाची बदली झाली आणि हे गाव गुलाबी झालं.

मुळात आजही ग्रामीण भागात मुलींचे शिक्षण हा विषय गौण ठरतो. या स्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंतघरचे शिक्षक जितेंद्र गवळी यांनी पुढाकार घेत पालकांमध्ये शिक्षणाविषयी प्रबोधन केले. गवळी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे आज गावातील २१ मुले शिकत असून त्यामध्ये नऊ मुली आहेत. मात्र या मुलींना शाळेत नियमित पाठवावे यासाठी गवळी यांनी प्रत्येक घराला गुलाबी रंग देण्याचे ठरवले. त्यासाठी सरकारी निधीचा वापर न करता गावातील लोकांनी एकत्र येत लोकवर्गणीतून गुलाबी गाव करण्याचा संकल्प करत त्याला मूर्तरूप दिले. गावकरी, शिक्षक, विद्यार्थी यांच्या प्रयत्नामुळे राज्यातील पहिले ‘गुलाबी गाव’ म्हणून भिंतघर प्रकाशात आले.

प्रत्येक कुटुंबांकडून प्रत्येकी 500 रुपये वर्गणी जमा करून गावाला रंगरंगोटी करण्यासाठी सुरुवात झाली आहे. ओला सुका कचरा संकलित करणे, रस्त्यावर सडा-रांगोळी घालून रस्ते सुशोभित करणे, गुरांच्या गोठ्यात स्वच्छता राखणे, मुलांचे गणवेश, त्यांना नीट नेटके ठेवण्यासाठी पालकांना मार्गदर्शन, भिंतीवर प्रबोधन करतील अशा सुरेख म्हणी, नागरिकांना वृक्ष तोडीपासून परावृत्त करणे, प्लास्टिक बंदी, गलुल बंदी, हुंडाबंदी यासारख्या सामाजिक प्रथांना रोखण्यासाठी गावकर्‍यांना संघटीत केले जात आहे. यासाठी गावकर्‍यांची आदर्श ग्रामसमिती स्थापन करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात राबवण्यात येणार्‍या विविध उपक्रमावर ऊहापोह केला जातो.

जितेंद्र गवळी येण्यापूर्वी त्या ठिकाणी नागरिकांमध्ये अनुत्साह होता. यापूर्वी गावातील जवळपास 10 जण किडनीच्या आजाराने दगावले असल्याने नागरिक हताश झाले होते. त्यांना या संकल्पना आणि उपक्रमात काही रस नव्हता. मात्र गवळी यांनी हार न मानता गावकर्‍यांच्या भावनांना साद घालून सर्वांची मते परिवर्तीत केले. नागरिकांना गावात पडणार्‍या पावसांची नोंद करण्यासाठी पर्जन्यमापक लावण्यास उद्युक्त केले.

जवळपास ८० कुटुंबं आणि ४०० लोकसंख्या असलेलं हे भिंतघर राज्यातलं पहिलं गुलाबी गाव ठरले आहे. गावात नीटनेटके रस्ते, एक घर एक झाड. प्रत्येक घरासमोर पक्षांसाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात दारूबंदीही करण्यात आली आहे.

सुरगाण्याच्या अतिदुर्गम भागात एक गुलाबी गाव उभे राहू शकते आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेतला तर विकासही होऊ शकतो. गाव करील ते राव काय करील, हे भिंतघरमध्ये आल्यावर पटते. भिंतघरने करुन दाखवले. इतर गावांनीही अशीच गुलाबी प्रेरणा नक्की घ्यावी