यंदाच्या शिवजयंतीला गडांवर दिसणार ‘हिरव्या मशाली; शिवजयंतीनिमित्त सयाजी शिंदेंचा नवा संकल्प

0
190

मराठी, हिंदी, आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते सयाजी शिंदे गेल्या अनेक वर्षांपासून वृक्षारोपणाची जबाबदारी घेऊन आहेत. ते नेहमीच झाडांच्या संवर्धनासाठी आणि वृक्षारोपण करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यामुळे त्यांच्या या वृक्षारोपणाच्या कामाला आता सर्वांनी हातभार लावण्याचा जणू संकल्पच केलाय.

सयाजी शिंदे यांच्या फॅनपेजवर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यंदा शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडं लावण्याचा संकल्प केला आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसली पाहिजे, असं आवाहनदेखील त्यांनी केलं आहे. इतकंच नाही तर शिवजयंतीनिमित्त ते स्वत: पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपन करणार आहेत.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झांडांचीही स्वराज्य व्हाव हीच इच्छा होती, पण पूर्ण सह्याद्री बोडका करुन टाकलाय आपण. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, झाडं म्हणजे रयतेची लेकरं, असं तळमळीनं सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की, नाही? आपण शिवरायांचे मावळे आहोत, येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर ४०० झाडे लावण्याचा संकल्प आपण करुयात.गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल.. झाडांची मशाल… कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही”, असे सयाजी शिंदे यांनी म्हटलं.