राज्यभरात १९ फेब्रुवारीला शिवजंयती साजरी केली जाणार असून संपूर्ण राज्य कोरोना संकटानंतर पूर्वपदावर येत असले तरीही राज्य सरकारकडून अद्याप काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर साधेपणाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून यासंबंधीची नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरवर्षीप्रमाणे किंबहुना यावर्षीही अनेक ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं आहे, काही ठिकाणी नाटक- व्याख्यानं आयोजित केली गेली आहेत. पण, बुधवारी राज्यात काल पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढल्यामुळं गृहविभागानं नव्याने आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातले आहेत. गड – किल्ल्यांवर जाऊन जयंती साजरी न करता घरी बसूनच हा उत्सव साजरा करावा. अनेक शिवप्रेमी किल्ले शिवनेरी किंवा अनेक गड- किल्ल्यावर जाऊन तारखेनुसार 18 तारखेला मध्यरात्री 12 वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. पण, यंदा हे सारं टाळावं असे सांगण्यात आले आहे.
काय आहे नियमावली –
– छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करा.
– यंदा गड-किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करु नये.
– सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करु नये.
– करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुकांना बंदी.
– महाराजांच्या पुतळ्यास किंवा स्मारकास पुष्पहार अर्पण करताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं.
– फक्त १० जणांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करावी.
– आरोग्यविषयक उपक्रम राबवण्याची परवानगी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण, महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासनानं या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत नागरिकांनाही तसं आवाहन करावं. या सूचनांशिवायही दरम्यानच्या काळात आणखी काही सूचना लागू झाल्यास त्यांचंही अनुपालन करावं.