टूलकिट म्हणजे काय? त्यामुळे काय होतो परिणाम?

0
362

हवामान बदल विरोधी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ट्विटच्या माध्यमातून ग्रेटाने पाठिंबा दिला. मात्र, तिच्या एका ट्विटमुळे मोठा गदारोळ सुरू झाला. भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रेटाकडून ‘टूलकिट’ शेअर करण्यात आले. काही वेळेनंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. ग्रेटा थनबर्ग, दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू यांच्या बातम्यांमुळे टूलकिट हा शब्द बातम्यांच्या बाजारात आलाय. पण अनेकांना प्रश्न पडलाय हे टूलकिट म्हणजे आहे तरी काय? एरवी नव्या गाड्या, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सबरोबर मिळते, ते टूलकिट सामान्यांना माहिती आहे… पण हे नवे टूलकिट आहे तरी काय?

टूलकिट म्हणजे नेमकं काय, त्यात काय असतं?

टूलकिट म्हणजे एक दस्ताऐवज असते. एखाद्या मुद्याची माहिती देणारे आणि त्यावर कृती करण्याबाबतची सविस्तर माहिती असते. एखादे मोठे आंदोलन अथवा मोहिमेत सहभाग घेणाऱ्या स्वयंसेवकांना याबाबतचे निर्देश दिले जातात. स्वयंसेवकांना, मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या या टूलकिटची मोठी मदत होते. ऑनलाइन अथवा ऑफलाइन सुरू असणाऱ्या कोणत्याही अभियानात एकाच वेळी, एकत्रितपणे एकाच दिशेने काम करण्यास याची मदत होते.

जगाच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं आंदोलन होत असतात. मग ते अमेरिकेतील black lives matter असो वा लॉकडाउन विरोधी आंदोलन… पर्यावरणाशी निगडित climate strike campaign असो किवा दुसरं कुठलं आंदोलन. अशा स्वरूपाची आंदोलन करताना त्याचा एक कृती कार्यक्रम (action points) तयार केला जातो. आंदोलन आणखी पुढच्या टप्प्यावर नेणं वा तीव्र करणं करण्याच्या उद्देशानं हे तयार केलं जातं. ज्यामध्ये हा कृती कार्यक्रम (action points) नोंदवण्यात येतो, त्याला टूलकिट असं म्हटलं जातं.

टूलकिटचा परिणाम काय होतो?

सोशल मीडियावर अनेकवेळा आपल्याला वेगवेगळे हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये असल्याचं बघायला मिळतं. एकाचवेळी अनेकांनी ट्विट करून तो हॅशटॅग वापरल्यानं हा परिणाम दिसून येतो. टूलकिटच्या माध्यमातून लोकांना समर्थन देण्याचं आवाहन करण्याबरोबरच त्या आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग वापरून ट्विट करण्याचं आवाहन केलं जातं. आंदोलनासंदर्भातील हॅशटॅग चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावरील लोकांचं याकडे लक्ष वेधलं जातं. महत्त्वाचं म्हणजे टूलकिट फक्त आंदोलनासाठीच वापरली जाते असं नाही. तर राजकीय पक्षांकडून मोठ्या कंपन्यांकडूनही त्याचा वापर केला जातो. विविध कार्यक्रमा प्रसंगी, अभियानावेळी वा एखाद्या घटनेनंतर टूलकिटचा वापर केला जातो.