चेपॉकच्या मैदानावर अश्विन यानं बळींची पंचमी साजरी केली. त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात धावांचा डोंगर उभारणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १३४ धावांत गारद झाला. फिरकीला पूर्णत: साथ देणाऱ्या चेपॉकच्या खळपट्टीनं दुसऱ्या दिवशी १५ फलंदाजांना बाद करत आपले रंग दाखले. ३४ वर्षीय अश्विन यानं कसोटी कारकीद्रीत २९ व्यांदा आणि मालिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच बळी घेण्याची किमया साधली. अश्विन यानं दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रमांना गवसणी घातली. दुसऱ्या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अश्विननं हरभजन सिंगची माफी मागिताना आदर व्यक्त केला आहे.
भारतात 23 वेळा 5 विकेट्स
अश्विनने इंग्लंडचा डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, डॅन लॉरेन्स, ऑली स्टोन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांना दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बाद केलं. यासह अश्विनने कसोटीमध्ये 29 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. अश्विनने एकूण 23 वेळा भारतात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तर 6 वेळा भारताबाहेर ही कामगिरी केली आहे.
हरभजनचा रेकॉर्ड मोडित
दरम्यान, अश्विनने भारतीय भूमीवर सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत हरभजन सिंहचा रेकॉर्ड मोडला आहे. भारतात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दिग्गज क्रिकेटपटू अनिल कुंबळे याचा नंबर लागतो. त्यानंतर अश्विनने आता दुसरं स्थान पटकावलं आहे. यापूर्वी हरभजन सिंह दुसऱ्या स्थानी होता. हरभजनचा रेकॉर्ड मोडित काढल्यानंतर अश्विनने त्याच्या वरिष्ठ माजी सहकारी हरभजन सिंह याची माफी मागितली आहे. दरम्यान, अश्विनने माफी मागितल्यानंतर हरभनजने अश्विनचं कौतुक करत त्याला असंच यश मिळवत राहा, अशा शुभेच्छादेखील दिल्या आहेत.
भारतात 266 विकेट्स
हरभजन सिंहने भारतात 28.76 च्या सरासरीने 265 विकेट मिळवल्या आहेत. तर अश्विनने 25.26 च्या सरासरीने 76 कसोटी सामन्यांमध्ये 266 विकेट्स मिळवल्या आहेत. एकूण 391 विकेट घेणाऱ्या अश्विनला त्याच्या या कामगिरीबाबत माहिती नव्हती. सामना संपल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा करत असताना त्याला याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी अश्विन म्हणाला की, ‘जेव्हा मी 2001 च्या सिरीजमध्ये भज्जू पा ला (हरभजन) खेळताना पाहिलं होतं. तेव्हा मला कधीही असं वाटलं नव्हतं की, मी कधी भारतीय संघासाठी ऑफस्पिनर म्हणून खेळू शकेन. मी तेव्हा माझ्या राज्यासाठी क्रिकेट खेळत होतो आणि मी एक फलंदाज म्हणून करिअर घडवू पाहात होतो.
‘…सॉरी भज्जू पा’ : अश्विन
अश्विन म्हणाला की, सुरुवातीच्या काळात मी जेव्हा हरभजनप्रमाणे गोलंदाजी करायचो तेव्हा सर्वजण माझी थट्टा करायचे. अश्विन म्हणाला की, ‘त्या वयातील माझे सहकारी माझी चेष्टा करायचे, कारण मी भज्जू पासारखी गोलंदाजी करायचो. त्याचे रेकॉर्ड मोडण्यासाठी तुम्ही आश्चर्यकारकपणे खास असायला हवं. मला त्याबद्दल माहिती नव्हती, आता जेव्हा मला त्याबद्दल माहिती आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. मला माफ कर, भज्जू पा. ‘
अश्विन तू चॅम्पियन आहेस : हरभजन
या प्रतिक्रियेनंतर हरभजनने अश्विनला उत्तर दिलं आहे. हरभजन म्हणाला की, “अश्विन तू चॅम्पियन आहेस. मी प्रार्थना करतो की, तू याहून मोठे रेकॉर्ड बनवावे. तू असाच खेळत राहा. भावा तुला त्यासाठी शक्ती मिळत राहो.”
You are a champion @ashwinravi99 I wish you many more records far bigger than this.. keep it up.. More power to you brother 🤝 God bless https://t.co/bGd5kUAmnD
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 14, 2021