किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह; राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी

0
349

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा-आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीची जयंती आहे. महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. उत्साहाच्या वातावरणात राज्यभर शिवाजी महाराजांना वंदन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त राज्यभर ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना संबंधित नियमांचे पालन करुन शिवरायांना अभिवादन केलं जात आहे.

शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी आदिवासी पारंपरिक नृत्य सादरीकरण झाले.

शिवजयंतीनिमित्त राज्यातील सर्व गडकोटांना सजवण्यात आले आहे. अनेक किल्ल्यांवर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. रायगड किल्ल्यावरही पुरातत्व खात्याने विद्युत रोषणाई केली आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळावरील पुतळ्याला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे. त्याचसोबत फुलांची आरास देखील करण्यात आली आहे. आज मुंबई विमानतळावर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना सोलापुरात मुस्लिम महिलांनी अभिवादन केलं. महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड यांच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने जयंती उत्सवावर निर्बंध घातल्याने ही शोभायात्रा रद्द करण्यात आली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला महिलांनी एकत्रित येऊन अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी नव्हते तसेच त्यांच्या काळात महिलांचा प्रचंड आदर केला जात होता. ही भावना समाजात रुजावी यासाठी मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन महाराजांना अभिवादन केल्याचे मत महिलांनी यावेळी व्यक्त केले.