सोशल मीडियाच्या जगात स्टार असलेल्या समीर गायकवाड (Tik Tok Sameer Gaikwad) याने रविवारी संध्याकाळी आत्महत्या केली. पुण्यातल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्याने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेमकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे परंतु ठोस कारण अजून समोर येऊ शकलेलं नाही.
घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती समीरच्या मित्राने नातेवाईकांना दिली. त्यानंतर पोलिसांना याबाबत सांगण्यात आलं. पुणे शहरातील वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील मिकासा सोसायटीत टिकटॉक स्टार समीर मनीष गायकवाड राहतो. रविवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला साडीच्या मदतीने गळफास लावला, अशी माहिती लोणीकंद पोलिसांनी दिली आहे. समीरला पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घरच्यांनी त्याला खाली उतरवरुन तातडीने लाईफ लाईन रुग्णालयामध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. समीरने आत्महत्या का केली यासंदर्भातील कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, सोशल मीडियावर समीरचे लाखो चाहते आहेत. त्याच्या आत्महत्येमुळे चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
कोण होता समीर गायकवाड?
पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये समीर गायकवाड शिकत होता. म्युझिक व्हिडीओ आणि शॉर्ट व्हिडीओ बनवणारा समीर हा ब्लॉगर म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. टिकटॉक स्टार म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय होता. अनेक प्रकारचे व्हिडीओ तयार करुन तो Tik tok वर अपलोड करायचा. त्याचे व्हिडीओ नेटकऱ्यांच्याही पसंतीस उतरायचे. याशिवाय समीर गायकवाडच्या इन्स्टावरही तुफान फॉलोअर्स होते. इन्स्टावर त्याच्या फॉलोअर्सची संख्या 2 लाख 80 हजार इतकी आहे.