जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

0
239

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे. मोटेरा स्टेडियम आता ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नावाने ओळखलं जाणार आहे. देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नरेंद्र मोदी स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या उद्घाटन सोहळ्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ स्टेडियम जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम असून यामध्ये 1 लाख 10 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.

नरेंद्र मोदींनी जे स्वप्न बघितलं ते पूर्ण झालं”

उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्टेडियमचं वेगळेपण अधोरेखित केलं. त्याचबरोबर हे नरेंद्र मोदींचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झालं आहे, असं शाह यांनी सांगितलं. “गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनी अशा प्रकारच्या स्टेडियमचं स्वप्न बघितलं होतं, जे आज पूर्ण झालं आहे. या नवं स्टेडियम जगातील सर्वात मोठं आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या स्टेडियमच्या आधारवर विकसित करण्यात आलेलं आहे. मोदी यांच्यासोबत खुप वर्षांपासून काम करत आहे. त्यांनी तरुणांना नेहमीच खेळासाठी प्रोत्साहित केलं आहे,” असं शाह यांनी यावेळी सांगितलं.

कसं आहे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’?

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियम 700 कोटींहून अधिक खर्च करुन बांधले आहे. यामध्ये 1,10,000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड स्टेडियम तयार करणार्‍या कंपनीने हे स्टेडियम डिझाइन केले आहे. यात 76 कॉर्पोरेट बॉक्स, चार ड्रेसिंग रूम आणि तीन सराव मैदाने आहेत. स्टेडियम व्यतिरिक्त, इनडोअर क्रिकेट अॅकाडमी व्यतिरिक्त जलतरण तलाव, स्क्वॅश आणि टेबल टेनिसची सुविधा आहे. मोटेरा स्टेडियमच्या लाईट्सही खूप वेगळ्या आहेत. फ्लड लाइट्स ऐवजी जागा एलईडी लाइट्स लावण्यात आल्या आहेत ज्या सौर उर्जेवर चालतात. याशिवाय स्टेडियममध्ये थ्रीडी थिएटरसुद्धा आहेत. ड्रेसिंग रूमशी जोडलेले उत्कृष्ट जिम देखील आहेत.