जागतिक मराठी भाषा दिवस’: लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।

0
989

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खूप मोठे आहे. आपण आणि भविष्यातील पिढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्यात येतो.

मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक मराठी माणासाची आहे. आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे. याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची साथ सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो. मध्यंतरी मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्अ‍ॅस अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्यरित्या देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून खच्चीकरण करण्यात येत होते. अशाप्रकारे मराठी भाषा संवर्धन होणार नाही.

मराठी भाषेतील पद्य साहित्या आणि गद्य साहित्य हे भाषेच्या शास्त्रशुद्ध व्याकरणामुळे साकार झाले. आधुनिक काळातील महात्मा फुले यांचा ‘शेतकर्‍यांचा आसूड’ हा ग्रंथ इंग्रजांच्या काळातील नवीन बदल दाखवतो. यामध्ये इंग्रजी सत्तेमुळे शेतकरंचे झालेले हाल, नवीन शैलीने रेखाटले आहे. तनंतर वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, चिं. वि. जोशी, कुसुमाग्रज, ग. दि. माडगूळकर, वि. स. खांडेकर, ना. सि. फडके यांसारख्या साहित्यिकांनी मराठीत आपल्या साहित्याची भर घालून मराठी भाषा मराठी मनामनातून जागृत ठेवली. आज सामाजिकशास्त्रे, तत्त्वज्ञान, चित्रकला, साहित्य, संगीत, नाटक यासारख्या कलांचे समीक्षा-विचार मराठीत मूळ धरू लागले आहेत. तर एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे.

मराठी भाषा टिकवून ठेवण्यासाठी काय करू शकतो?

  • आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज किमान १० तरी ‘फोन कॉल’ हाताळतोच. दहाही वेळा आपण संभाषणाची सुरु वात ‘हॅलो..!’ अशी करतो. आपण आपल्या मातृभाषेतून ही सुरुवात केली तर? म्हणजेच ‘नमस्कार!’ या शब्दाने आपण संवादास सुरु वात केली तर? त्यामुळे आपल्या भाषेबद्दलचे प्रेमही व्यक्त होईल शिवाय एखादी अनोळखी व्यक्ती, जी आपल्याशी थेट हिंदी अथवा इंग्रजीतून संवाद साधण्यास सुरुवात करते मात्र तिचीही मातृभाषा मराठीच असते अशी अधिक जवळकीने-मोकळेपणाने आणि मुख्य म्हणजे नेमक्या अभिव्यक्तीद्वारे आपल्याशी संवाद साधू शकेल.
  • आपण हल्ली सामान्यपणे महिन्याला किमान एकतरी चित्रपट पाहतोच.. मग तो कितीही ‘टुक्कार’ का असेना! अशा वेळी आपण आपल्या भाषेसाठीसुद्धा चित्रपट प्रेमातून काही करू शकत असू तर? वर्षांतून किमान दोन मराठी चित्रपट आणि दोन मराठी नाटके आपण नाही का पाहू शकणार? किंवा अगदी मित्र-मैत्रिणींसह जाऊन आपण मातृभाषेतील कलाकृतींचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली तर.
  • आपण हल्ली सर्रास पुस्तके वाचतोच. अशा वेळी ठरवून वर्षांकाठी किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे ही कृतीसुद्धा अशीच सहज जमणारी आणि भाषेसाठी काही केल्याचा आनंद देणारी ठरू शकेल. त्यापुढे जाऊन वाचकांचा एखादा गट तयार केल्यास मराठी पुस्तक खरेदीवर काही विशेष सवलत मिळू शकेल का ते पाहता येऊ शकेल.
  • वाढदिवसाला, शुभकार्याला, अभिनंदन करताना भेटवस्तू देण्याची प्रथा आता चांगलीच रुजली आहे. अशा वेळी ही भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके/ काव्यसंग्रह/ नाटय़कृती यांचा आपण विचार करायला हवा.

ह्या सर्व गोष्टींमुळे आपल्या मातृभाषेचा म्हणजेच मराठीबद्दल प्रसार होईल आणि मराठी भाषेची गोडी येणाऱ्या पिढीला लक्षात येईल.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी॥