पुण्यात नाईट कर्फ्यू वाढवला; शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंदच

0
305

करोनानं डोकं वर काढलेल्या पुण्यात प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्रेक झाल्यानंतर नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला असून, रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंतची संचारबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २८ फेब्रुवारीपर्यंत हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णय पुन्हा वाढवण्यात आला असून, पुणे शहारातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस १४ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत.

शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 14 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असले तरी या काळात ऑनलाईन शिक्षणास परवानगी असेल, अशी माहितीही महापौर मोहोळ यांनी दिली आहे.

दरम्यान पुण्यातील मंदिरांवर देखील कोरोनाचा प्रभाव पाहायला मिळतो आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेच्या अंतर्गत मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली होती. मात्र कोरोना विषाणू पुन्हा फोफावत असल्याचं लक्षात घेवून राज्यसरकारने योग्य ते कठोर नियम लागू करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर 2 मार्च रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद असल्याने भाविकांमध्ये नाराजी आहे, असे असले तरीही खबरदारीसाठी हे निर्बंध आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.

दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने भाविकांनी बाप्पांचं ऑनलाइन दर्शन घ्यावं, असे आवाहन केलं जात आहे. त्यामुळे गणेश भक्तांना अंगारकी चतुर्थीच्या दिवशी www.dagdushethganpati.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन दर्शन घेता येणार आहे.

तीन ठिकाणी कोव्हिड सेंटर
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. काल तर एकाच दिवशी जवळपास कोरोनाचे सातशे रुग्ण आढळून आले. यानंतर महापालिका अगदी अलर्ट झाली आहे. रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तीन ठिकाणी महापालिका कोव्हिड सेंटर सुरू करणार आहे.

रक्षक नगर, गणेश कला क्रीडा मंडळ, पठारे स्टेडियम या तिन्ही सेंटरवर 500 बेड्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रुग्णांना बेड्स मिळणं सुलभ होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे सेंटर पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे.

गरज पडल्यास पुन्हा जंबो कोव्हिड सेंटर सुरु करणार
तसंच गरज पडल्यास पुन्हा जम्बो कोविड सेंटरही सुरू करणार असल्याची माहिती अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली आहे. एकंदरितच कोरोनाला आळा प्रतिबंध घालण्यासाठी पुणे महापालिका अॅक्शन मोडमध्ये आहे.