जर तुम्ही येत्या काही दिवसात विमान प्रवासाचे नियोजन करीत असाल तर तुम्हाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. रूग्ण संख्येत वाढ होत असल्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार सतर्क झाले आहेत. दरम्यान विमाने प्रवास करणाऱ्यांसठी नागरी वाहतूक महासंचालनालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कठोर नियमांचं पत्रक जारी केलं आहे. त्यामुळे प्रवाश्यांना अधिक खबरदारी घेणे आवश्यक असणार आहे.
प्रवासादरम्यान जे प्रवासी नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील डीजीसीएने पत्रकात स्पष्ट केलं आहे. जे प्रवासी प्रवासादरम्यान मास्क लावत नाहीत किंवा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नसतील तर त्यांना विमानातून खाली उतरवण्यात येणार आहे. जर सातत्यानं प्रवाशांनी नियमांचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कायमस्वरुपी विमान प्रवास बंदी घातली जाऊ शकते.
डीजीसीएच्या परिपत्रकातील नियमावली:
1 विमान प्रवासादरम्यान मास्क लावणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अनिवार्य आहे.
2 अपवादात्मक स्थिती व्यतरिक्त मास्क नाकाखाली आणता येणार नाही.
3 विमानतळावर प्रवासी प्रवेश करताना सीआयएसएफ (CISF) किंवा पोलिस कर्मचारी मास्क न लावता आत येऊ शकणार नाहीत याची काळजी घेतील
4 विमानतळ संचालक (Airport Director) किंवा टर्मिनल व्यवस्थापक (Terminal Manager) हे प्रवाश्यांनी मास्क व्यवस्थित लावला आहे की नाही, प्रवाश्यांकडून सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातय की नाही यावर लक्ष ठेवतील.
5 विमानतळ परिसर किंवा विमानात जर कोणाताही प्रवासी नियमांचं पालन करत नसेल तर त्यास इशारा देऊन सोडून देण्यात येईल. परंतु, कायद्यानुसार कारवाई करण्याचा उल्लेख या परिपत्रकात आहेत.
6 उड्डाणापूर्वी विमानात बसलेला कोणताही प्रवासी इशारा देऊनही मास्क नीट लावत नसेल तर त्यास विमानातून उतरुन देण्यात येईल.
7 विमान प्रवासात एखादा प्रवासी सातत्याने मास्क वापरण्यास नकार देत असेल आणि कोविड नियमांचं पालन करत नसेल तर त्यास उपद्रवी प्रवाश्याप्रमाणे वागणूक दिली जाईल
8 उपद्रवी प्रवासी यादीतील प्रवाश्यांना विमान प्रवासास बंदी (Ban for Air Travel) केली जाईल. नव्या नियमांनुसार ही बंदी 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी असेल.