New Corona Guidelines : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर

0
231

कोरोना विषाणूच्या संसर्गानं पुन्हा एकदा राज्यात डोकं वर काढल्यामुळं आता पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिल्यानुसार काही निर्बंध पुन्हा लागू करण्यात आले आहेत, तर काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. राज्याचं आर्थिक चक्र सुरु ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतानाच राज्य शासनानं नव्यानं नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्य सरकारकडून हे निर्बंध घालण्यात आले असून परिपत्रकाद्वारे ते जारी करण्यात आले आहे. यामध्ये सिनेमा हॉल, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, लग्न, धार्मिक कार्यक्रम अशा ठिकाणी किती लोकांना परवानगी असेल आणि कोणत्या नियमांचं पालन करावं लागेल यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.

नवीन नियमावली:

  • राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांनुसार सर्व सिनेमागृहे, हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने कार्यरत राहतील. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील.
  • शॉपिंग मॉल्समध्ये देखील मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. मॉल व्यवस्थापनाने मॉलमधील सिनेमागृह आणि रेस्टॉरंट नियम पाळत आहेत याची खात्री करावी.
  • कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक कारणांसाठी एकत्र येण्यास मनाई असेल. तसे झाल्यास ज्या जागी असे कार्यक्रम होतील, त्या जागेच्या मालकावर कारवाई केली जाईल.
  • लग्नकार्यामध्ये ५० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नाही. नियम मोडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
  • अंत्यविधींसाठी २० पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्याची परवानगी नसेल.
  • होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रुग्णांना देखील नियम पाळावे लागतील. त्यांची माहिती आणि संबंधित डॉक्टरांची माहिती स्थानिक प्रशासनाला द्यावी लागेल.
  • होम आयसोलेशनमधील व्यक्तीच्या घराच्या दरवाजावर किंवा संबंधित जागेवर १४ दिवसांसाठी ही बाब स्पष्ट करणारा बोर्ड लावावा.
  • होम क्वारंटाईनचा स्टॅम्प संबंधित रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
  • होम क्वारंटाईन असणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींनी देखील गरज असेल तरच मास्क लावून घराबाहेर पडावे.
  • आरोग्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व कार्यालये ५० टक्के कर्मचारी क्षमतेनंच सुरू राहतील. कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
  • धार्मिक स्थळांनी संबंधित ठिकाणी येणे शक्य होणाऱ्या व्यक्तींची कमाल मर्यादा जाहीर करावी. या व्यक्तींना संबंधित ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून वावर करण्यासाठी पुरेशी जागा असायला हवी. तेवढ्याच व्यक्तींना प्रतितास प्रवेश दिला जावा.