तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: १६ मार्च…आणि सचिनचं शतकांचं शतक!

0
269

16 मार्च ही तारीख भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसाठी खूप खास आहे. आजच्या दिवशी 2012मध्ये सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय शतकांचे शतक साजरे केले होते. मीरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध रंगलेल्या सामन्यात सचिनने 114 धावांची धमाकेदार खेळी केली होती. सचिनचा शतकांच्या शतकाचा विक्रम आजही अबाधित असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात सर्वाधिक शतके ठोकणारा खेळाडू म्हणून सचिनची ख्याती आहे.

सचिनचं 99 वं आंतरराष्ट्रीय शतक हे 12 मार्च 2011 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वर्ल्ड कप मॅचमध्ये झालं होतं. त्यानंतर प्रत्येक मॅचमध्ये सचिनकडून 100 व्या शतकाची अपेक्षा होती. उर्वरित वर्ल्ड कप आणि त्यानंतर झालेल्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेत सचिनला शतक झळकावता आलं नाही. अनेकदा तो शतकाच्या जवळ आऊट झाला. त्याला हा विक्रम सतत हुलकावणी देत होता.त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमी तब्बल 10 महिने त्याच्या या शतकाची वाट पहात होते.

१६ मार्च २०१२ साली एशिया कपमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने बांग्लादेश संघाविरूद्ध मिरपूर येथे झालेल्या सामन्यात ही शतकी खेळी केली होती. एशिया कप २०१२चा हा चौथा सामना होता. बांग्लादेशचा कर्णधार मुशफिकूर रहीमने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीला बोलवले. तेव्हा गौतम गंभीर सोबत सलामीला आलेल्या सचिनने १४७ चेंडूंचा सामना करताना ११४ धावा केल्या होत्या. त्यात १२ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता.

त्या शतकानंतर २ दिवसांनी अर्थात १८ मार्च २०१२ रोजी सचिन पाकिस्तान संघाबरोबर आपला शेवटचा वनडे सामना खेळला. परंतू हा त्याचा शेवटचा वनडे सामना असेल असे तेव्हा कुणालाही वाटले नाही कारण वनडेतील निवृत्तीची घोषणा सचिनने २३ डिसेंबर २०१२ रोजी केली.

सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३४,३४७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय कारकिर्दीत त्याने १८४२६, तर कसोटीत १५९२१ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याने ५१, तर एकदिवसीय सामन्यांत ४९ शतके ठोकली आहेत.