रामायण’ मालिकेतील ‘भगवान राम’ साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
488

रामायण’ या मालिकेतून प्रसिद्ध झालेले अभिनेता अरुण गोविल यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. रामानंद सागर यांची मालिका ‘रामायण’ (Ramayan) मध्ये त्यांनी भगवान राम (Ram) यांची भूमिका साकारली होती. अरुण गोविल (Arun Govil) यांनी भाजप कार्यालयात प्रवेश केला. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह उपस्थित होते. अद्याप भाजपाकडून त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार, याविषयी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आगामी ५ राज्यांमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण गोविल यांचा भाजपा प्रवेश झाल्यामुळे निवडणुकांच्या प्रचारात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. नुकतेच अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी देखील भाजपामध्ये प्रवेश केला असून पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या प्रचारसभांमधून मिथुन चक्रवर्ती ममता बॅनर्जी आणि डाव्या पक्षांवर जोरदार टीका करत आहेत.

भाजपमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अरुण गोविल म्हणाले की, ‘यावेळी जे आपले कर्तव्य आहे ते केले पाहिजे. आधीचे राजकारण मला समजले नाही, परंतु मोदीजींनी जेव्हापासून देश सांभाळला आहे तेव्हापासून देशाची व्याख्या बदलली आहे. मी मनापासून आणि बुद्धीला जे पटतं ते करतो.’

अरुण गोविल म्हणाले की, आता मला देशासाठी योगदान द्यावे असे मला वाटते आणि त्यासाठी आम्हाला व्यासपीठाची आवश्यकता आहे. आज भाजपा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. ते म्हणाले की, मी पाहिले की ममता बॅनर्जी यांना “जय श्री राम” या घोषणेची एलर्जी आहे. ‘जय श्री राम’ ही फक्त घोषणा नाही.

अरुण गोविल यांच्या आधी ‘रामायण’ या मालिकेतील इतर कलाकारांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. रामायणात ‘सीता’ची भूमिका साकारणारी दीपिका चिखलिया, ‘हनुमान’ साकारणारे दारा सिंह आणि ‘रावण’ साकारणारे अरविंद त्रिवेदी यांनीही राजकारणात प्रवेश केला आहे. दीपिका चिखलिया यांनीही दोन वेळा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली आहे.