या चिमण्यांनो परत फिरा रे, घराकडे अपुल्या
जाहल्या तिन्हीसांजा जाहल्या…
आज जागतिक चिमणी दिन… उंच इमारतींच्या छतांवर, आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अगदी कुठेही चिमणी नेहमीच आढळून येते. लहान मुलांच्या भावविश्वात जितके स्थान चांदोबाला असते, तितकेच ते चिऊताईलाही असते. त्यामुळे, प्रत्येकाच्या मनात या चिमणीविषयी कुठे ना कुठे जिव्हाळा असतो.चिमण्याच्या आवाजाने पूर्ण परिसर हसून उठत असतो. चिमण्याच्या चिव- चिवाटामुळे आपल्याला एक अल्हादायक वातावरणाचा अनुभव येत असतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणे महत्वाचे आहे. आपलं जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रम्य करण्यासाठी चिऊताई नक्कीच हवी. आपल्या किलबिलाटानं आयुष्याचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या चिऊताईचं अस्तित्व अन् वैभव जपणं म्हणूनच गरजेचं आहे. सध्या देशभरातील चिमण्यांच्या अनेक जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास चिमण्यांच्या संख्येस कारणीभूत ठरला असल्याचे देखील सांगितले जात आहे. वाढत्या शहरीकरणासह सिमेंट-काँक्रिटीकरणाच्या जंगला मुक्या पशु-पक्षांचा निवारा हरवताना दिसतोय. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरातील तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव झालीय. अन् यातूनच 2010 पासून 20 मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातोय.
हे चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे आपुल्या’ हे ग. दि. माडगूळकरांचे गाणे आजच्या दिवसाला पूर्णपणे लागू होते. असे म्हटले तर चुकीचे ठरता कामा नये, एक घास चिऊताईचा असे म्हणून आई आपल्या बाळाला एक -एक घास मायेने भरवते. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. कुठेतरी प्रत्येकाच्या बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. सध्यातरी चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले आहे. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
भारतात चिमण्यांच्या पाच प्रजाती
साधारणतः आपल्याला आढळून येतात त्या चिमण्यांना ‘हाउस स्पॅरो’ म्हणून संबोधले जाते. याशिवाय, भारतात पाच प्रजातींच्या चिमण्या आढळून येतात. त्यामध्ये, स्थलांतर करणाऱ्या प्रजातींचादेखील समावेश आहे. याशिवाय, जगातही २४ प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यापैकी बहुतांश प्रजातींची कोणतीही आकडेवारी उपलब्ध नाही. अशा गणनांमधून केवळ चिमण्यांची संख्याच नव्हे तर त्यांचे अधिवास, जीवनशैली याबद्दल देखील माहिती मिळण्याची शक्यता आहे.
चिमणी आणि पिटकांठ किंवा रान या दोन प्रकारच्या चिमण्या आढळून येतात. यातील हाऊस स्पॅरो अर्थात आपल्या परिसरात दिसणारी चिमण्यांची संख्या सध्या कमी होत आहे. चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. ग्रामीण भागात चिमण्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. प्रमुख अन्न बिया, भात, गहू, बाजरी मात्र शहरात हे खाद्य चिमण्यांना मिळत नाही. चिमण्यांना आपल्याला जर वाचवायचे असेल आणि आजच्या लहान मुलांनाही चिऊताईच्या गोष्टी सांगताना जर ती दाखवायची असेल तर त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे माझं मत आहे.
चिमण्यांना वाचविण्यासाठी हे करूयात :
१) उन्हाचा तडाखा वाढल्याने या पक्षांच्या पाण्याच्या सोयीसाठी घरात किंवा अंगणात पाण्याची व्यवस्था करावी. त्यासाठी एखादे मातीचे भांडे पक्ष्यांना पाणी पिणे पिणे शक्य होईल अशा ठिकाणी ठेवावे.
२) या पक्षांसाठी कमीत कमी दहा फुट उंचीवर लाकडाचे किंवा कपट्याचे कृत्रिम घरटे तयार करावे.
३) पक्षांना लागणारे धान्य दररोज त्यांना उपलब्ध होईल अशा पद्धतीने टाकणे. उरलेले अन्न पक्षांना टाकणे.