Parambir Singh Letter: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप

0
303

मुंबईच्या माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. त्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. “दर महिन्याला १०० कोटी जमा करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी सीआययूचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांनी दिले होते. त्यातले ४० ते ५० कोटी रुपये मुंबईतल्या १७५० बार आणि रेस्टॉरंट्समधून गोळा होऊ शकतात, असं देखील गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना सांगितलं होतं”, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात केला आहे. तसेच, हे आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांनी एसीपी पाटील यांच्यासोबत मेसेजवर झालेलं संभाषण देखील सोबत जोडलं आहे.

 

परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे की “सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या सरकारी बंगल्यावर गेल्या काही महिन्यात फंड जमा करण्यासाठी अनेकदा बोलावलं होतं. फेब्रुवारीच्या दरम्यान या भेटी झाल्या. अशा भेटीदरम्यान अनेकद एक-दोन स्टाफ मेंबर आणि देशमुख यांचे स्वीय सहाय्यक पालांडे देखील तिथे उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट दिलं होतं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी जवळपास 1 हजार 750 बार, रेस्टॉरंट आणि मुंबईतील काही बाबींचा समावेश होता. ज्यातून प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते. म्हणजेच महिन्याकाठी 40-50 कोटी रुपये जमा होतील. उर्वरित पैसे हे इतर बाबीतून मिळवता येतील, असं म्हणता येईल.”

अनिल देशमुख यांनी आरोप फेटाळले

दरम्यान परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांनी हे आरोप फेटाळले आहेत. अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे की, “मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.”