उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातून गंभीर आरोप गृहमंत्र्यावर केले आहे. या धक्कादायक प्रकरणावर आज राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले.
शरद पवार यांची प्रतिक्रिया
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले अधिकारी परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझेंना दिले असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान गृहमंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले असले तरीही राज्यात राजकीय वादळ आले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी प्रतिक्रिया या दिली आहे.
शरद पवार याविषयी बोलताना म्हणाले की, ‘अनिल देशमुखांवर लावलेले आरोप गंभीर आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्राचे दोन भाग आहेत. एक मोहन डेलकर प्रकरणावर आहे तर दुसरा वाझे प्रकरणावर आहे. दरम्यान या पत्रामध्ये देशमुखांवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
पैसे गोळा कसे केले जातात हे पत्रात लिहिलेले नाही
पवार म्हणाले की, ‘परमबीर सिंहांनी मला आणि मुख्यमंत्र्यांना हे पत्र पाठवले आहे. त्यात यांनी लिहिलेय की, गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी जमा करण्याचे टार्गेट वाझेंना दिले होते. मात्र त्यांनी या पत्रामध्ये पैसे गोळा कसे केले जातात आणि ते कुणाकडे दिले जाते यात नमूद केलेले नाही.’
परमबीर सिंह यांच्या पत्रावर त्यांची सही नाही. सचिन वाझेंची पुन्हा नियुक्तीही परमबीर यांनीच केली होती. परमबीर सिंह यांचे आरोप त्यांची बदलीनंतर करण्यात आले आहेत. परंतु त्यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता. याप्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी. असे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातून गंभीर आरोप गृहमंत्र्यावर केले आहे. या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीस म्हणाले, “शरद पवारांची पत्रकारपरिषद मी पाहिली, ते म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती.”
तसेच, “आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. त्यांनी ज्यावेळी हे सांगितलं की वाझे यांना परमबीर सिंग यांनी घेतलं, हे खरंच आहे. परमबीर सिंग यांची समिती त्या ठिकाणी होती. त्या समितीत अनेक लोकं होते, त्यांनी निर्णय घेतला वाझेंना परत घेतलं. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय सरकार झोपलं होतं का? सरकारला माहिती नव्हतं? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का? एखादा निलंबीत असलेला व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतला, तर त्याला महत्वाचं अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही? एवढं नाही, तर सगळ्या महत्वाच्या केसेस, या त्यांच्याचकडे देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं का? माझं स्पष्ट मत असं आहे.
हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. पण अशाप्रकारचा खुलासा करणारे, परमबीर सिंग हे पहिले व्यक्ती नाही. या पूर्वी महाराष्ट्राचे महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे.” अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.
राज ठाकरे यांची प्रतिक्रिया:
ज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला १०० कोटी वसूल करून देण्याची मागणी केली होती, असं सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं असून, या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला आहे. सिंग यांनी केलेले आरोप आणि अनिल देशमुख यांच्याबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने करावी अशी मागणी केली. “”आपण मूळ विषय विसरत आहोत. सुशांत सिंग प्रकरण बाजूला राहिले आणि लोक मूळ विषय विसरून जातो. मुळात मुकेश अंबानींच्या घराजवळ बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे, तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? याची उत्तरं अजून का नाही मिळाली? आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्ब सापडतात आणि ती गाडी पोलिसानी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा. केंद्राकडून या गोष्टीचा तपास व्हायला हवा. याचा तपास झाला, तर धक्के बसतील असे चेहरे समोर येतील,” असा गौप्यस्फोट राज यांनी केला आहे.
जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाचा बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगण्यासाठी वापर होतो हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायलाच हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.