मराठी पाऊल पडते पुढे: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांचा बोलबाला

0
232

चित्रपट प्रेमींसाठी अत्यंत महत्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यात काही मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार मिळाले. या पुरस्कारात गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतल्या पोरांनी हवा केलीय. यामध्ये बार्शीतला तरुण दिग्दर्शक विनोद कांबळेच्या ‘कस्तुरी’ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर बार्शीतला अभिनेता विठ्ठल काळेच्या काजरोला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन तसंच सामाजिक विषयांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आनंदी गोपाळ सिनेमाला पुरस्कार जाहीर झाला आहे.

बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र असलेल्या विठ्ठल काळे यांनी मुख्य भूमिका साकारलेल्या काजरो या कोकणी चित्रपटास यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मराठमोळे अशोक राणे यांच्या ‘सिनेमा पाहणारा माणूस’ या पुस्तकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. अशोक राणे यांचं हे एक आत्मकथनात्मक पुस्तक आहे. अशोक राणेंना तिसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. पहिला पुरस्कार ‘चित्तरकथा’ या पुस्तकासाठी 1996 रोजी तर दुसरा 2003 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार मिळाला होता.

सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून ‘बार्डो’ची निवड करण्यात आलीये. तर ‘जक्कल’ या मराठी सिनेमाला बेस्ट इन्व्हेस्टिगेटीव्ह फिल्म हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. नॉन फिचर फिल्म बेस्ट दिग्दर्शक डेब्यू म्हणून राज प्रितम मोरे यांना ‘खिसा’ सिनेमासाठी पुरस्कार जाहीर झालाय.

राष्ट्रीय एकात्मतावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘ताजमहाल’ याला पुरस्कार जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार सावनी रविंद्र हिला बार्डोमधील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी मिळाला आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांना ताशकंत फाईल्स या सिनेमासाठी मिळाला आहे.

बार्डो’ हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी गायिका सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला आहे.