Pune Holi Guidelines: होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास पुण्यात मनाई

0
178

राज्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. येत्या रविवारी 28 मार्च रोजी होळी सण आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी येणारी धुळवड हे दोन्ही सण वाढत्या कोरोनामुळे पुणेकरांना साजरे करण्यावर पालिकेने बंदी घातली आहे.

कोरोना आटोक्यात येऊ लागल्याने देशासह राज्य अनलॉकच्या दिशेने पावलं टाकू लागलं. पण कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने राज्यावर पुन्हा चिंतेचे ढग दाटू लागलेत. त्यामुळे महानगरांमध्ये कोरोनाच्या अनुषंगाने कठोर निर्बंध लावायला सुरुवात झाली आहे. अशातच होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीचे सण साजरे होणार आहेत. त्यामुळेच हे सण साजरे करण्यासाठी अनेकांच्या नजरा पर्यटनास्थळाकडे वळणार, तसे अनेकांनी नियोजन ही करायला सुरुवात केलीये. हे पाहता लोणावळ्यासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी गर्दी होण्याची आणि प्रसंगी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊनच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुखांनी निर्बंध घातलेत. होळी, धुळवड आणि रंगपंचमी हे सण एकत्रित येऊन साजरे केले जातात. हीच गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, खाजगी मोकळया जागा आणि सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागांमध्ये जमण्यास बंदी घातली आहे. नियम झुगारल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पुणे हे कधीकाळी देशातील सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट बनलेलं. त्यानंतर तिथली कोरोनाची स्थिती निवळली. इतकी की कोविड सेंटरही बंद करण्यात आलेले. मात्र आता पुन्हा पुण्यात कोरोना डोकं वर काढू लागला आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद ३ हजारावर होऊ लागली आहे.

पुणे पालिकेने जारी केली होळीसंदर्भातील नियमावली

पुणे पालिकेने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केलं असून यानुसार सार्वजनिक ठिकाणी म्हणजे हॉटेल, रिसॉर्ट तसंच मैदाने, मोकळ्या जागा अशा कोणत्याही ठिकाणी होळी पेटवता येणार नाही आणि रंग उडवता येणार नाही.

हा सण वैयक्तिकरित्याही साजरा करता येणार नाही असेही पत्रकात नमूद केलं आहे

उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असंही पत्रकात म्हटलं आहे

गेल्या वर्षी 9 मार्च म्हणजे होळीच्या दिवशीच पुण्यात आणि राज्यातही पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.

यंदाही होळी, धुळवडीवर निर्बंध आल्याने सलग दुसऱ्या वर्षी पुणेकरांचा बेरंग झाला आहे.