World Theater Day: जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व

0
575

२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.

व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. 1843 मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या गद्य व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. ‘नाटक’ हे मराठी माणसाचे पहिले ‘वेड’ आहे असे म्हणतात ते चुकीचे नाही. चार मराठी माणसे एकत्र जमली की हमखास एखादे ‘नाटक’ सादर केले जातेच. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.

राज्यभरात आजही विविध संस्थांतर्फे एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. एकांकीका स्पर्धेला महाविद्यालयीन तरुणांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. अशा स्पधरामधून लेखन, दिग्दर्शन, अभिनय क्षेत्रांत आणि रंगभूमीच्या अन्य तांत्रिक विभागासाठीही नवी गुणवत्ता पुढे येण्यास मोलाची मदत होत आहे.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणार्‍या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एकेकाळी काही मातब्बर नाटयगृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटयगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुटीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटयगृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे

काही नाटकांचा अपवाद वगळता नाटकाच्या प्रयोगाला 18 ते 25 या वयोगटांतील किती तरुणाई नाटक पाहायला येते, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तरुणांचे किंवा त्यांच्या विषयाशी संबंधित नाटक असेल तर तरुण वर्गाची नाटकाला गर्दी होते. अन्यथा नाटकाला येणारा बहुतांश प्रेक्षक हा 45-50 या आणि त्यापुढील वयोगटाचाच आहे, असे चित्र पाहायला मिळते.

मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे.

‘मराठी रंगभूमीचा उद्धार केला पाहिजे, अशी तोंडाची वाफ आपण सतत दवडतो; पण रंगभूमीसाठी प्रत्यक्षात काय करतो? गेलेले सुवर्ण दिवस आठवण्याशिवाय रंगभूमीच्या उत्कर्षासाठी काही करतो का? हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.

मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. दरम्यान, अगोदर चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात गुरफटलेली आहे. पण, या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून नपाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची गरज आहे.