करोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कठोर पावले टाकत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याची सूचना दिली होती. त्यानुसार आदेश जारी करण्यात आले असून आज (२७ मार्च) मध्यरात्रीपासूनच हा आदेश लागू असणार आहे. ज्यामध्ये संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजिनक ठिकाणे बंद राहणार आहेत. आज मध्य रात्रीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांचं उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड देखील आकारला जाणार आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
– मिशन बिगीन अंतर्गत हे आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील.
-राज्यात सर्वत्र २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू असेल. रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अशी जमावबंदीची वेळ असेल. या वेळेत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. तसे झाल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.
– सर्व सार्वजनिक ठिकाणं ( उद्याने आणि समुद्र किनारे ) रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहतील. २७ मार्च रोजी मध्यरात्रीपासून हा आदेश लागू होईल. हा आदेश मोडला गेल्यास प्रत्येकी १ हजार रुपये दंड करण्यात येईल.
– मास्क शिवाय कुणी फिरताना आढळल्यास त्याला ५०० रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकताना आढळल्यास १ हजार रुपये दंड करण्यात येईल.
– सर्व सिनेमागृहे (सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्सेस), मॉल, ऑडिटोरियम आणि रेस्टॉरंट्स रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात यावीत. होम डीलिव्हरी आणि टेक अवे यासाठी मात्र या वेळेत परवानगी असेल.
कोणत्याही सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमास मनाई राहील. अशा कार्यक्रमांसाठी नाट्यगृह व सभागृह वापरण्यासही मनाई असेल.
– लग्न समारंभासाठी ५० जणांच्या उपस्थितीची मर्यादा असेल तर अंत्यसंस्काराला २० जण उपस्थित राहू शकतील.
– आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थितीचे बंधन राहील.