जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आज बीज सोहळा आहे. तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच आम्हा साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.
संत तुकाराम सतराव्या शतकातील सामाजिक प्रबोधनाची मुहूर्तमेढ रोवणारे निर्भीड कवी होते. समाजाच्या तळागाळातील लोकांनाही सहज उमजतील, अशा संतरचना तुकारामांनी केल्या. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतांत गेलेले हे दोन्ही अवतार होते; परंतु, मानव असूनही सदेह वैकुंठगमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकमेव होते. तुकाराम बीजनिमित्त संत तुकारामांची थोडक्यात माहिती जाणून घेऊ..
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा) हे सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. त्यांचा जन्म माघ शुद्ध वसंत पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. संत तुकाराम एका सुखवस्तू घरात जन्माला आले. त्यांची वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले. तीन भावांमध्ये तुकोबा मधले. थोरला भाऊ थोडासा विरक्त. घर-प्रपंच व्यवस्थित चाललेला असताना या कुटुंबावर एकामागोमाग एक आपत्ती कोसळू लागल्या. आईवडील गेले, थोरल्याची बायको गेली, तुकोबांची नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी रखमाबाईही गेली. सुस्थितीत असणाऱ्या तुकोबांवर कर्जबाजारी होण्याचा प्रसंग आला. अशा अपघातात सर्वसामान्य माणसे खचून जातात, तुकोबांच्या थोरल्या भावाप्रमाणे घर-संसार सोडून निघून जातात किंवा वैतागून देहत्यागही करतात. इथेच तुकोबांचे थोरपण आहे. तुकोबा हरिचिंतनात निमग्न झाले. आपल्याला झालेल्या जगरहाटीचे दर्शन त्यांनी आपल्या अभंगानुभवातून शब्दबद्ध केले.
संसारात वावरत असताना येणाऱ्या सुख-दुःखांना काही अंतरावर कसे ठेवावे, गुंतून न राहताही संसार कसा करता येतो त्याचे मार्गदर्शन तुकोबांसारखे दुसऱ्या कोणी केलेले नाही. स्वतः कटू अनुभवांचे हलाहल पचवून जगाला सद्विचारांचे अमृत उपलब्ध करुन देणारे तुकोबा या गुणविशेषांत केवळ महादेवाशीच तुलना होऊ शकेल, असे महान संत आहेत.
देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर आजही एक वृक्ष आहे. त्याचे नाव नांदुरकी. आजही तो तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकोबाराया वैकुंठाला गेले, त्या वेळी प्रत्यक्ष हलतो आणि याची अनुभूती सहस्रो भक्तगण घेतात.
तुकाराम बीज कशी साजरी करतात :
तुकाराम बीजे दिवशी अनेक ठिकाणी विविध प्रकारे साजरी केली जाते . ग्रामीण भागात ज्या ठिकाणी नांदुरुकीचे झाड आहे . तुकाराम महाराजांची पूजा करतात ,नंतर उपवास सोडला जातो .