Dadasaheb Phalke Award: सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

0
416

बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत (Rajinikanth) यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत घोषणा केली.

दादासाहेब फाळके पुरस्कार आतापर्यंत चित्रपटातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 50 सेलिब्रिटींना देण्यात आला आहे. आता 51 वा पुरस्कार सुपरस्टार रजनीकांत यांना देण्यात येणार आहे. रजनीकांत गेली पाच दशके सिनेमा जगतावर राज्य करत आहेत आणि लोकांचे मनोरंजन करत आहेत, म्हणूनच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांच्या नावाची एकमताने शिफारस केली, असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं.

वयाच्या 25व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात!

रजनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक 1975मध्ये वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी मिळाला. हा चित्रपट होता ‘अपूर्व रागंगल’ (Apoorva Raagangal). कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ 15 मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका केली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

आधी होते कंडक्टर

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत त्यांच्या घराजवळ असलेल्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत असे एकमेव अभिनेते आहेत ज्यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख केला गेला. अनेकजण त्यांची पूजा करत असले तरी ते स्वत: मात्र कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

प्रत्येक सिनेमानंतर हिमालय ‘ब्रेक’

प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. 1978 साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे 35 फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.

रजनीकांत यांच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते

टॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप पाडल्यानंतर रजनीकांत यांना बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि वेगळ्या स्टाईलच्या जोरावर त्यांना लोकांची मनं जिंकली. त्यांच्या स्टाईलने अनेकांना वेड लावलं. त्याची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाईल, कॉईन उडवण्याच हटके स्टाईल, गॉगल घालण्याची आणि हसण्याची स्टाईल अशा अनेक गोष्टी चाहत्यांच्या मनात घर करुन गेल्या. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही कॉपी केली गेली.