Pune University : विद्यापीठाकडून मुख्य परीक्षेपूर्वी सराव परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

0
292

पुण्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध कडक (Restrictions in Pune) करण्यात आले आहेत. पुण्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा यंदा ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. नुकतंच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच ५ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीदरम्यान, सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. या सराव परीक्षा देतांना विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा देणं विद्यार्थ्यांना सोयिस्कर जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 5 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात ही सराव परीक्षा होणार आहे.

गोंधळ टाळण्यासाठी मोठी खबरदारी

दरम्यान विद्यापीठाच्या पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत इ मेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येईल. sppuexam.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सूचना, युजर मॅन्युअल आणि व्हिडीओच्या माध्यमातून परिक्षेविषयी माहिती दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास हेल्पलाईन 020- 71530202 क्रमांकही देण्यात आला आहे