कडक निर्बंधांचा निषेध करण्यासाठी पुणे व्यापारी महासंघ रस्त्यावर

0
244

राज्य सरकारपाठोपाठ पुणे महापालिकेने शहरात जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या निर्णयाचा पुण्यातील व्यापारी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी पुणे व्यापारी महासंघासह पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनांनी राज्य सरकारला साकडे घातले आहे. पुण्यातील व्यापाऱ्यांनी ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा निषेध केला आहे.

आज पुणे शहरात लक्ष्मी रस्त्यावर विजय टॉकीज ते क्वार्टर गेट दरम्यान अडीच किलोमीटर च्या दरम्यान 8 ते 10 हजार व्यापारी दुतर्फा बॅनर घेऊन दुकाने बंद ठेवण्याच्या विरोधात उतरले होते. आम्हाला विरोधकांची फूस नाही, विकेंड लॉक डाऊन मान्य आहे मात्र पूर्णपणे दुकाने बंद ठेवायला विरोध आहे, अशी भूमिका यावेळी या व्यापाऱ्यांनी मांडली. ‘कोरोना से मरेंगे कम, लॉकडाऊनसे मरेंगे हम..’ असे बॅनर घेऊन पुण्यातील व्यापारी रस्त्यावर उतरले होते.

गेल्या वर्षी तोट्यात गेलेला व्यापार आता सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाउन लागले. व्यापाऱ्यांमुळे करोना वाढतो, अशी ओरड केली जाते; पण शहरात अनेक कारखाने, पेट्रोलपंप, रिक्षा, खाद्यपदार्थ, स्टॉल्सवर गर्दी आहे. दिवसा पाच व्यक्तींना एकत्र फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे पालन होत नाही. ज्यांच्यावर बंधने लादायला हवीत, त्यांना बंधने न घालता केवळ व्यापाऱ्यांवर बंधने घालणे हा अन्याय आहे. एप्रिल, मे महिन्यांत रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, गुढीपाडवा, अक्षयतृतीया यांसारखे महत्त्वाचे सण आहेत. २५ दिवसांच्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा विचार सरकारने करावा,’ अशी मागणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.