हॅपी बर्थडे हिटमॅन: भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा याचा आज वाढदिवस

0
625

भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार ‘हिटमॅन’ म्हणजेच रोहित शर्मा याचा आज वाढदिवस. तो आज आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने कोट्यावधी चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशातच मुंबई इंडियन्स संघाच्या कुटुंबातर्फे देखील त्याला अप्रतिम असा ग्राफिक्स शेअर करत शुभेच्छा देण्यात आल्या आहे. हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून महत्वाची भूमिका बजावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला हिटमॅन नावाने ओळखले जाते. त्याचे कारणही तितकेच खास आहे. पुल शॉटचा बादशाह रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३ दुहेरी शतक झळकावले आहेत. असा कारनामा करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. रोहितने एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन वेळा द्विशतके लगावून आपल्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2014 साली त्याने 264 धावांची खेळी केली होती. रोहितच्या नावावरील हा विक्रम अद्यापही कोणाला मोडता आलेला नाही.

आपल्या कारकरीदिच्या सुरुवातीस रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघात मधल्या फळीत खेळायला यायचा. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला एक वेगळे वळण दिले. कारण 2013 दरम्यान भारतीय संघाला चांगल्या सलामीवीराची गरज होती. हेच ओळखत धोनीने 2013 साली त्याला सलामीला येण्यास सांगितले. हाच रोहितच्या करियरमधील मास्टर स्ट्रोक समजला जातो. या दरम्यान रोहितने चँम्पियन्स ट्रॉफित (ICC Champions Trophy) दोन अर्धशतके केली. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहितने 209 धावा करत सलामीला आपणच योग्य असल्याचे सिद्ध केले. उत्तुंग आणि लांब षटकार मारणारा खेळाडू म्हणून रोहितची ओळख आहे. तसेच तो वनडे क्रिकेटमध्ये तीनवेळा व्दिशतकीय खेळी करणारा एकमेव फलंदाज आहे. रोहित व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाने तीन वेळा द्विशतकी कामगिरी केलेले नाही.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार

रोहित टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पहिला आहे. 2007 साली 20-20 ला त्याने सुरूवात केली. आतापर्यंत त्याने 96 सामन्यात 2331 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 118 हा सर्वाधिक स्कोअर आहे. दरम्यान रोहितच्या नावावर एकमात्र असा विक्रम आहे तो अद्याप कोणीलाही मोडता आलेला नाही. जगातील तो एकमेव फलंदाज आहे त्याने 20-20, एकदिवसीय आणि कसोटीमध्ये सर्वाधिक 3-3 शतकीय खेळी केली आहे. 2015 साली दक्षिण अफ्रिकेविरुद्ध रोहितने टी – 20 सामन्यात आपले पहिले शतक केले. तर आयपीएलमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना रोहितने मुंबईला (Mumbai Indians) 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले. तसेच मागच्या वर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान (ICC Cricket World Cup) इंग्लडमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत 5 शतके झळकावली होती. रोहितने टीम इंडियाकडून खेळताना आंतरराष्ट्रीय टी – 20 मध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा भारतीय खेळाडू आहे. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 35 बॉलमध्ये शतकी खेळी करत कर्णधार पदाला साजेसा पराक्रम केला होता. यासह टी – 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक 4 शतके ठोकणारा रोहित शर्मा एकमेव फलंदाज आहे.