महाराष्ट्र दिन विशेष: काय आहे महाराष्ट्र दिन साजरा करण्यामागचे महत्त्व?

0
407

महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.१ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही ओळखला जातो.

जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व…
स्वतंत्र महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रक्रिया सुरू होती. मात्र राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देणं नाकारलं होतं. आपली मुंबई हिसकावून घेण्याची चिड मराठी माणसांमध्ये धुमसत होती. २१ नोव्हेंबर १९५६ रोजी सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक भव्य मोर्चा फ्लोरा फाऊंटनसमोरील चौकात जमला. प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत होता. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. तरी पोलिसांना हा मोर्चा आवरेना. पोलिसांचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली

संत तुकाराम, ज्ञानेश्वर, आणि एकनाथ यांच्या सारख्या कित्येक महान संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. आणि या महाराष्ट्राच्या मातीतून कित्येक थोर महात्मे जन्माला आलेले आहेत. अश्या या महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा १ मे १९६० रोजी देण्यात आला. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र महाराष्ट्राची जी लगाम आहे ती त्या वेळी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपविली.

तसे पाहिले तर आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आणि ऐतिहासिक वारसा हा खूप मोठा आहे सोबतच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामागे आपल्या या महाराष्ट्राच्या कित्येक क्रांतिकरांचा हात आहे, मग ते वासुदेव बळवंत फडके असोत की लोकमान्य टिळक असोत.

म्हणूनच महात्मा गांधीजींनी या महाराष्ट्र देशाला मोहळाची उपमा दिली होती. महाराष्ट्रात जन्माला येणं म्हणजे पूर्व जन्मीच पुण्य सार्थक झाल्या सारखे आहे, प्रत्येकाला गर्व असावा असा आपला महाराष्ट्र. याच महाराष्ट्राने कित्येक, कवी, कलाकार, संगीतकार, खेळाडू यांना जन्म दिलाय, ते कवी पु.ल.देशपांडे असोत की कवियत्री बहिणाबाई आजही ते साहित्याच्या रुपात आपल्या महाराष्ट्रात जिवंत आहेत.

हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्राने मुघलांचे राज्य स्वीकारले नाही आणि त्या काळात स्वराज्याचे स्वप्न आपल्या डोळ्यासमोर ठेवले, आणि फक्त डोळ्यासमोरच ठेवले नाही तर आपले प्राण पणाला लावून रयतेसाठी स्वराज्याची स्थापना सुध्दा केली, आणि सर्वदूर सुराज्य निर्माण केले, माझ्या राजांबरोबर असणाऱ्या मावळ्यांचा या स्वराज्यात आणि महाराष्ट्राच्या निर्माणात खारीचा वाटा आहे. आणि त्या सर्वांना विसरता काम नये.