वर्क फ्रॉम होम’मुळे गुगलला मोठ्या प्रमाणात फायदा; वर्षभरात वाचवले ७४०० कोटी रुपये

0
434

कोरोनामुळे संपूर्ण जगात ‘घरातून काम करण्याचा’ ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे आता कर्मचार्‍यांवर होणाऱ्या खर्चात कपात झाली आहे. भारतीय कंपन्यांसह जगातील सर्व मोठ्या कंपन्या पूर्वीच्या तुलनेत ऑपरेशनल आघाडीवर कमी खर्च करीत आहेत. दिग्गज तंत्रज्ञान कंपनी गुगलनेही वर्क फ्रॉम होम काम केल्यामुळे गेल्या एका वर्षात 7400 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.

वर्क फ्रॉम होम मुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत असला तरी कंपन्यांना मात्र फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. गुगलने वर्क फ्रॉम होम मुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले आहेत.

यातून वाचले कंपनीचे पैसे
महामारी मुळे गुगलचे कर्मचारी वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला २६८ मिलियन डॉलर म्हणजेच १९८० कोटी रुपये वाचवता आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोविड १९ मुळे हे शक्य झाले आहे. दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर १ बिलियन डॉलर म्हणजेच ७ हजार ४०० कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण पैसा कंपनीचा वाचला आहे. गुगल कर्मचार्‍यांच्या करमणुकीसाठी आणि त्यांच्या सोईसाठी खूप खर्च करते. Google वर, कर्मचार्‍यांना अन्न, मनोरंजन आणि सोई पुरवण्यासाठी बरेच पैसे खर्च केले जातात. पण, आता घरातून काम असल्यामुळे हे भत्ते आता कर्मचार्‍यांना दिले जात नाहीत. त्यामुळे कंपनीकडे बरेच पैसे शिल्लक आहेत.

कंपनी या वर्षीच्या अखेरला ऑफिसमध्ये काम सुरू करण्याची प्लानिंग करीत आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर रुथ पोराटने गुंतवणूकदारांना सांगितले की, कंपनी हायब्रिड मॉडलवर लोकांना ऑफिसला बोलावण्याची योजना बनवीत आहे. ज्यात ऑफिस येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी असणार आहे.