Akshaya Tritiya 2021 : काय आहे अक्षय्य तृतीयाचे महत्त्व? कशाप्रकारे साजरा करतात आजचा दिवस?

0
578

साडेतिन मुहुर्तांपैकी एक मुहूर्त म्हणुन ज्या दिवसाचं महत्व विशद केलं जातं असा हा दिवस अक्षयतृतीया. अक्षय्य तृतीया हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय्य तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते. नवीन गोष्टींची सुरूवात करण्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर असते. या दिवशी केलेल्या दानाचं अक्षय्य स्वरूपात पुण्य मिळतं अशीही धारणा भारतीय संस्कृतीत आहे.

अक्षय “या शब्दाचा अर्थ काय?
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे). यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.

हिंदु परंपरेप्रमाणे या दिवशी करावयाच्या गोष्टी –

  • अक्षयतृतीयेच्या दिवशी नदीत किंवा समुद्रात स्नानाचे महत्व सांगीतले आहे.
  • फळं, वस्त्राचे दान, पंखा, तांदुळ, मीठ, साखर, तुप, चिंच, याचे दान ब्राम्हणाला देऊन दक्षिणा द्यावी.
  • ब्राम्हण भोजनाचे देखील या दिवशी महत्व आहे.
  • या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने, नवे वस्त्र खरेदी करावे.वाहन घ्यावयाचे झाल्यास त्याची खरेदी अक्षयतृतीयेला करावी.
  • या दिवशी सातुचे महत्व असुन त्याचे दान दयावे आणि सेवन देखील करावे.
  • पाण्याने भरलेली घागर वाळा घालुन ब्राम्हणास दान द्यावी.
  • पळसाच्या पानांनी बनवलेल्या पत्रावळीवर खीर, कैरीचे पन्हं, चिंचोणी, कुरडया, कैरीची डाळ ब्राम्हणास खावयास द्यावी.

शेतीसंबंधी प्रथा :

या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते.

मातीत आळी घालणे व पेरणी : अक्षय्य तृतीयेनंतर पावसाळा येणार असतो. गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे मशागत करण्याचे काम अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पूर्ण करायची प्रथा आहे. (मशागत म्हणजे नांगरलेल्या शेतजमिनीची साफसफाई करून खत मिश्रित मातीच्या थरांना खालीवर करणे.) या दिवशी मशागत केलेल्या जमिनीतील मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून काही शेतकरी पूजन केलेल्या मृतिकेमध्ये आळी घालतात. कोकणात या दिवशी शेतात बियाणे पेरण्याची प्रथा आहे, देशावर नाही. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बियाणे पेरण्यास सुरुवात केल्यास त्या बियाणांपासून विपुल धान्य पिकते व कधीही बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे. (बियाणे म्हणजे मळणीतील धान्य आपल्या आवश्यकतेनुसार खाण्यासाठी बाजूला काढून घेऊन पुढच्या पेरणीसाठी राखून ठेवलेले उरलेले धान्य.)
महाराष्ट्राच्या कोकण भागात पावसाचे प्रमाण जास्त असल्या कारणाने एकदा पावसाला सुरुवात झाली की, सतत पाऊस पडत राहिल्याने सुपीक जमिनीतील चिकट मातीमध्ये आळी करून बियाणे पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पावसाळा तोंडावर असतांना मशागत केलेल्या भुसभुशीत मातीमध्ये बियाणे पेरणे सोपे जाते.

वृक्षारोपण : अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही, अशी समजूत आहे.

या गोष्टी दान केल्या जातात

अक्षय्य तृतीयेला वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात मानली जाते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सरबत आणि सत्तू इत्यादी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले जाते की, या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून बरेच लोक या दिवशी सोने-चांदी देखील दान करतात.

अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी का केली जाते

या सणाच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यात भांडे, सोने, चांगी सारखी वस्तू असतात, याची खरेदी या दिवशी करणं खूप शूभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की, या दिवशी घेतलेले सोने हे येत्या पिढीप्रमाणे वाढत जाते. या दिवशी सूर्याची किरणं खूप दिप्यमान असतात. त्यात सोन्याचा संबंध सूर्याशी असल्याने या दिवशी सोन्याची खरेदी करणं म्हणजे शक्ती मिळवण्यासारखं असतं.