इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष: ह्यांच्यामधील वादाचा काय इतिहास आहे?

0
320

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. जेरुसलेमचा ताबा व अखत्यारी हे इस्रायल-पॅलेस्टाइन दरम्यान सुरु असलेल्या भांडणाचे प्रमुख कारण आहे. पूर्व जेरुसलेम कायदेशीर रित्या जरी वेस्ट बॅंकचा भूभाग असला तरी तेथील अनेक जागांवर इस्रायलने लष्करी कब्जा करून अतिक्रमण केले आहे. जेरुसलेममधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे अनेक देशांनी आपले इस्रायलमधील दूतावास तेल अवीव येथे हलवले आहेत.

गाझातील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलसोबत सुरू झालेल्या संघर्षात आतापर्यंत ७० ठार झाले आहेत. त्यामध्ये १६ मुलांचा समावेश आहे. तर, ३०० हून अधिक गंभीर जखमी आहेत. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, हमासने १५०० रॉकेट डागले आहेत. इस्रायलने केलेल्या कारवाईत ११ कमांडर ठार झाले आहेत. तर, एक इस्रायली जवान ठार झाला आहे.

ह्यावेळी वादामागील कारण काय होते?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील वाद नवा नाही. पण नुकताच सुरू झालेला वाद हा रमजान महिन्यातील आहे. मक्का आणि मदिना नंतर मुस्लीम धर्मातील तिसरं प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून जेरुस्लेममधील अल अक्साची ओळख आहे. या मशिदीत नमाज सुरू असताना पोलीस जमाव पांगवण्यासाठी गेले. पण याचवेळी झटापट झाली आणि संघर्ष पेटला. हा वाद पुढे चांगलाच चिघळला आहे. अल अक्सावरील हल्ल्याला उत्तर म्हणून हमासने रॉकेट हल्ला सुरू केला, त्याला इस्रायलनेही प्रत्युत्तर दिलं आणि हा वाद पेटला.

इस्रायल-पॅलेस्टाईन वादाचा काय इतिहास आहे?

इस्रायल आणि पॅलेस्टाईन हा वाद दुसऱ्या महायुद्धानंतर चालत आलेला आहे. अरब हे पॅलेस्टाईनमधील मूळ निवासी आहेत. पण ज्यूंसाठी इस्रायलची स्थापना झाली. संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार १९४७ ला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. त्याअगोदरही बऱ्याच घटना घडल्या होत्या. ब्रिटिशांच्या मध्यस्थीने १९१७ ला ज्यूंसाठी स्वतःचं घर म्हणून पॅलेस्टाईनमध्ये जागा देण्यात आली, ज्याला बॅलफोर करार असं म्हटलं जातं. पहिल्या महायुद्धानंतर कोणाचं कोणत्या देशावर नियंत्रण असेल याची विभागणी ब्रिटनने केली, ज्यात ब्रिटनने पॅलेस्टाईन स्वतःला ठेवलं.

इस्रायलवर हल्ला – पहिलं अरब युद्ध

संयुक्त राष्ट्राकडून ही घोषणा होताच इजिप्त, सीरिया, इराक, ट्रान्स जॉर्डन या देशांनी इस्रायलवर हल्ला केला. पण नव्याने जन्म घेतलेल्या इस्रायलने धैर्याने या युद्धाचा सामना केला आणि या सर्व देशांना पिटाळून लावलंच, शिवाय त्यांची जागाही हिसकावून घेतली. १९४७ ला मिळालेल्या जागेपेक्षा जास्त क्षेत्रफळ इस्रायलने मिळवलं होतं. या युद्धात इस्रायलने स्वतःला वाचवलं असलं तरी मोठी समस्या समोर आली. या युद्धात इस्रायलमधून जवळपास ७ लाख लोकांनी स्थलांतर केलं आणि विविध देशात आसरा घेतला. यामुळे गाझावर इजिप्तने, तर वेस्ट बँकवर जॉर्डनने कब्जा केला, तर उर्वरित भागावर इस्रायलचा ताबा होता. त्यामुळे मूळ देश असलेल्या पॅलेस्टाईनचं अस्तित्वच धोक्यात आलं.

संघर्षाची खरी सुरूवात

आतापर्यंत फक्त इस्रायलचा संघर्ष सुरू होता. कारण, अरब देशांचे हल्ले बंद झाल्यानंतर इस्रायलचं हे एक प्रकारे मोठं यशच होतं. आता पॅलेस्टाईन स्वातंत्र संघटनेने (पीएलओ) स्वातंत्र्यासाठी संघर्ष सुरू केला. अनेक हल्ले केले, इस्रायलवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. १९८७-९३ या काळात इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा पहिला टप्पा मानला जातो. इस्रायलवर अनेक हल्ले झाले, तर इस्रायलनेही याला प्रत्युत्तर दिलं. अनेक ज्यू आणि पॅलेस्टाईन नागरिकांचा या हिंसाचारात मृत्यू होतच राहिला.

हमासचा उदय

सध्या इस्रायलवर हल्ले करत असलेल्या हमासचा उदय याच काळात झाला. पीएलओपेक्षा हमासची विचारधारा अत्यंत वेगळी होती. हमासचा इस्रायलला तीव्र विरोध होता, शिवाय इस्रायलला आम्ही मान्यताच देत नाही, असं हमासचं म्हणणं होतं. तर पीएलओ त्यांच्या हक्कासाठी लढत होती.

१९९३ ला पहिल्यांदाच इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये मोठा शांती करार झाला. यासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थता केली. याला ओस्लो करार म्हटलं जातं. या करारात इस्रायल आणि पीएलओ यांनी एकमेकांच्या काही मागण्या मान्य केल्या.

संघर्षाचा दुसरा टप्पा

२००० साली कॅम्प डेव्हिड २ ही चर्चा अपयशी ठरली. त्यानंतर संघर्षाचा दुसरा टप्पा सुरू होतो. इस्रायलमध्ये अनेक हल्ले करण्यात आले. मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला, ज्यात जू आणि पॅलेस्टाईन नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला. या काळातच इस्रायलच्या धोरणातही अनेक बदल घडून आले. हा मुद्दा सोडवण्यापेक्षा त्याचं नियोजन करावं लागेल, असं धोरण आखण्यात आलं. याशिवाय इस्रायलच्या विचारधारेतही बदल घडून आला. आतापर्यंत इस्रायलमध्ये पॅलेस्टाईन वाद सोडवणारे पक्ष जिंकत होते, तर आता पॅलेस्टाईनचा खात्मा करु असं म्हणणारे पक्ष निवडणूक जिंकायला लागले.

गाझामधून इस्रायलने २००५ मधून आपलं सैन्य मागे घेतलं. यानंतर हमासने गाझामध्ये निवडणूक जिंकली आणि पूर्ण ताबा मिळवला. हमास सत्तेत आल्यामुळे इस्रायलची डोकेदुखी वाढली. हमासने इस्रायलवर हल्ले सुरू केले. परिणामी इस्रायलने गाझाला पूर्णपणे ब्लॉक केलं. सीमा बंद करण्यात आल्या आणि गाझामध्ये जाण्यासाठी इस्रायल सैन्याची परवानगी अनिवार्य करण्यात आली.

पॅलेस्टाईनची मागणी काय?

सध्या जेरुस्लेमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण, या शहरात ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्माचे प्रसिद्ध धार्मिकस्थळं आहेत. पण इस्रायलने या शहरावर नियंत्रण ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. जेरुस्लेमच्या पूर्व भागात मुस्लीम, पश्चिमेला ज्यू आणि मध्य भागात ख्रिश्चन लोकसंख्या जास्त आहे. मुस्लीम धर्माची मक्का आणि मदीना नंतरची सर्वात प्रसिद्ध मशिदही जेरुस्लेममध्येच आहे. संयुक्त राष्ट्राच्या करारानुसार, हे शहर इस्रायलला देण्यात आलेलं नाही. पण इस्रायलकडून हीच आपली राजधानी असल्याचा दावा केला जातो. पण जगाकडून याला अद्याप मान्यता मिळालेली नाही. सर्व देशांचे दुतावास अजूनही तेल अविवमध्येच आहेत.

दुसरा मोठा मुद्दा हा पॅलेस्टाईन विस्थापितांचा आहे. जवळपास ५० लाख पॅलेस्टाईन नागरिक सीरिया, जॉर्डन, इजिप्त आणि इतर देशांमध्ये विस्थापित म्हणून राहतात. त्यामुळे भविष्यात कधीही शांतता करार झाला तर या पॅलेस्टाईन नागरिकांना देशात घेतलं जावं अशी पॅलेस्टाईनची मागणी आहे. पण इस्रायलचा यासाठी स्पष्ट नकार आहे. कारण, इस्रायलची लोकसंख्याच ८० लाख आहे, त्यात ५० लाख पॅलेस्टाईन नागरिकांना घेतलं तर सुरेक्षाचा मुद्दा निर्माण होईल, असं इस्रायलचं म्हणणं आहे.