तौक्ते चक्रीवादळः चक्रीवादळ येण्यामागे काय कारण असते?

0
558

चक्रीवादळ हे एक प्रकारचे विध्वंसक वादळ आहे. हे समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल फिरणाऱ्या हवेमुळे बनते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन, अटलांटिकमध्ये होणाऱ्यालाहरिकेन, आणि पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून ह्या नावाने ओळखले जाते. चक्रीवादळ हे नावच विध्वंसाचा पर्यायी शब्द म्हणून ठरू शकते इतके नुकसान यामुळे होते. सायक्लोन (चक्रीवादळ)या शब्दाची निर्मिती सायक्लोस या ग्रीक भाषेतील शब्दापासून झाली आहे. या शब्दाचा अर्थ सापाचे वेटोळे असा होतो. बंगालची खाडी व अरबी समुद्रामध्ये या वादळांचे सापाच्या वेटोळ्यासारखे चित्र दिसल्यामुळे हेन्री पेडिंगटन यांनी या वादळांना सायक्लोन असे नाव दिले. तेथून पुढे या चक्रीवादळांना ‘सायक्लोन’ असे संबोधले जाऊ लागले.

चक्रीवादळाची निर्मिती कशी होते?
समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती चोहोबाजूंनी येणाऱ्या वाऱ्यांमुळे वादळ तयार होते. वातावरणातील उष्ण व आर्द्र हवेचा सततचा पुरवठा हे चक्रीवादळाच्या निर्मितीचे प्रमुख कारण आहे. समुद्राचे तापमान हा चक्रीवादळाच्या निर्मितीचा मोठा घटक ठरतो. समुद्रात २६ डिग्री अंश सेल्सि अंश तापमान ६० मीटर खोलीपर्यंत असणे, हे त्यासाठी पोषक ठरते. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्यासाठी तापमानातील वाढ हा घटक सर्वाधिक कारणीभूत असतो. सागरात जेव्हा तापमानात वाढ होते तेव्हा तिथं कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेले असतो. त्याचदरम्यान वाऱ्याचा वेगही वाढतो.

कमी दाबाचा पट्टा, उच्च तापमान आणि जोरानं वाहणारं वारं, असं त्रिकूट मिळून मग चक्रीवादळाला जन्म देतं.

चक्रीवादळ विध्वसंक का ठरते?
चक्रीवादळात वाऱ्यांचा वेग त्याने केलेल्या विध्वंसाचे मुख्य कारण ठरते. या वाऱ्यांमध्ये असलेल्या बाष्पाच्या प्रमाणामुळे चक्रीवादळ जेथून प्रवास करते तेथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे पूरही येऊ शकतो.

चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखण्यात येते. हिंदी महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना इंग्रजीत ‘सायक्लोन‘, वेस्ट इंडिज बेटे आणि अटलांटिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना ‘हरिकेन‘ तर चीनचा समुद्र आणित पॅसिफिक महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळाला ‘टायफून‘ असे संबोधण्यात येते. ऑस्ट्रेलियात चक्रीवादळांना ‘विली-वि‌लीस‘ असे म्हटले जाते. जेव्हा वादळ जमिनीवर तयार होते तेव्हा त्याला ‘टोरनॅडो‘ असे म्हणतात.

चक्रीवादळाची दिशा
पृथ्वी स्वतःभोवती 24 तासात एकदा फिरते. याला परिवलन म्हणतात. यामुळे पृथ्वीच्या फिरण्यामुळे आणि वाऱ्याच्या दिशेनुसार चक्रीवादळाचा प्रवास सुरू होतो.

ही वादळं अनेक दिवस आणि शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकतात. त्यांच्या जन्माची ठिकाणं आणि नेमका प्रवास सांगता येणं कठीण असलं तरी अंदाज बांधता येऊ शकतो. जसं दरवर्षी हिवाळ्यात आंध्र-ओडिशाच्या दिशेने एक तरी चक्रीवादळ येतंच. किंवा अमेरिकेत फ्लोरिडामध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोठं चक्रीवादळ येतंच येतं.

चक्रीवादळाचे मापन कसे होते?
चक्रीवादळाच्या तीव्रतेचे मापन श्रेणींमध्ये करण्यात येते. चक्रीवादळातील वाऱ्यांच्या वेगावरुन त्याला श्रेणी देण्यात येते. हे वारे ताशी ९० कि.मी. ते कमाल ताशी २८० कि.मी. या वेगाने वाहतात. वाऱ्यांच्या वेगावरच त्याची विध्वंसक शक्ती अवलंबून असते. हा वेग विविध उपकरणे व उपग्रहानी पाठवलेली माहिती याआधारे मोजला जातो. वातावरणीय स्थिती, वाऱ्यांचा वेग (प्रतितास किमीमध्ये), कमी दाबाचा पट्टा, वातावरणशास्त्र(क्लायमॅटॉलॉजी) व रडार वापरून या चक्रीवादळांचे मोजमाप होते. तसेच खालीलप्रमाणे वाऱ्याच्या वेगानुसार होणाऱ्या नुकसानीचा अंदाज बांधता येतो.
श्रेणी-१ ताशी ९० ते १२४ किमी
श्रेणी-२ ताशी १२५ ते १६४ किमी
श्रेणी-३ ताशी १६५ ते २२४ किमी
श्रेणी-४ ताशी २२५ ते २७९ किमी
श्रेणी–५ ताशी २८० किमी किंवा त्यापेक्षा जास्त

सध्या अरबी समुद्रात ‘तौक्ते’ नावाचं चक्रीवादळ घोंघावत आहे. लक्षद्वीप आणि दक्षिण पूर्व अरबी समुद्राच्या (Arabian sea) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. या चक्रीवादळामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा विचार करता राज्याच्या किनारपट्टी असलेल्या भागाला याचा मोठा फटका बसू शकतो. यात प्रामुख्याने मुंबई, ठाणे पालघर भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत फार मोठे नुकसान होण्याची शक्यता नाही, मात्र तरीही मुंबईतील काळजी घेतली जात आहे. मुंबईत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाने केले आहे.

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शहरातील अनेक भागात सकाळी पावसाच्या हलक्या सरी पडल्यात.तौत्के वादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.