केंद्र सरकारनं म्युकरमायकोसिसचा केला साथरोग कायद्यात समावेश; म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

0
317

भारतात आत्तापर्यंत असलेल्या करोना रोगाच्या साथीसोबतच म्युकरमायकोसिस या नव्या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं केंद्र सरकारने मान्य केलं आहे. कारण या आजाराचा केंद्र सरकारने साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये समावेश केला आहे. देशात वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगाणा आणि राजस्थानने याआधीच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराला महामारी घोषित केलं आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने देखील म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेतली असून या आजाराचा समावेश साथरोग कायद्यामध्ये करण्यात आला आहे. बुधवारी केंद्र सरकारकडून त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली.

म्युकरमायकोसिससाठीही आता साथ नियंत्रण कायदा लागू

  • साथीचे रोग नियंत्रण कायदा ( 1897) अंतर्गत आता म्युकरमायकोसिस हा लक्षणीय आजार म्हणून समावेश होणार आहे.
  • सर्व राज्य सरकारं, खासगी हॉस्पिटल्स यांना आजाराच्या चाचणीबाबत, उपचाराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरनं दिलेल्या गाईडलाईन्स बंधनकारक राहणार आहे.
  • सर्व संशयित, आजारी रुग्णांच्या केसेस केद्रीय आरोग्य मंत्रालयाला कळवणं बंधनकारक असेल.
  • एपिडेमिक अॅक्ट लागू झाल्यानंतर केंद्राला अंमलबजावणीसाठी विशेष अधिकार प्राप्त होतात. कायदा लागू करण्यासाठी नियम आखणाऱ्या सरकारांना कोर्टातल्या अपीलांपासूनही संरक्षण मिळतं.
  • ब्रिटीशांनी प्लेगच्या साथीत आणलेला हा कायदा कोविडपाठोपाठ आता म्युकरमायकोसिससाठीही लागू होत आहे.
    देशात गेल्या महिनाभरात या रुग्णांची संख्या काही हजारांत पोहचली आहे. एकट्या महाराष्ट्रातच या आजाराचे 800 ते 850 रुग्ण असल्याचं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

वाढती संख्या पाहता राज्याला 2 लाख इंजेक्शनची गरज आहे. पण काही कारणामुळे ही इंजेक्शन मिळायलाही 31 मे ची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे पुढचे 10 दिवस महत्वाचे…या आजाराबाबत आरोग्यमंत्र्यांच्या बोलण्यात जो इशारा आहे तो महत्वाचा आहे. आज केंद्रानं उचललेल्या पावलातही तेच गांभीर्य दिसतंय.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे.