विराट कोहलीचा भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून तिथे न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना, तसेच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, त्याचवेळी भारताचा दुसरा संघ पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ वनडे आणि ३ टी-२० मालिका खेळवण्यात येईल. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे. १३ जुलै ते २५ जुलै या काळात टीम इंडिया श्रीलंकेसमोर उभी असेल. करोनाचे संकट पाहता सर्व सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ जेव्हा इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत असेल तेव्हा भारताचा दुसरा संघ श्रीलंका दौऱ्यावर असेल. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने होणार आहे. पहिली वनडे १३ जुलै, दुसरी १६ तर दिसरी १८ जुलै रोजी होईल. त्यानंतर २१ जुलैपासून टी-२० मालिकेला सुरूवात होईल. पहिली लढत २१, दुसरी २३ आणि तिसरी लढत २५ जुलै रोजी होणार आहे.
भारताचे श्रीलंकेसोबतचे सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहेत. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून श्रीलंका दौऱ्यासाठी नवीन आणि युवा खेळाडूंचा संघ पाठवला जाणार आहे.श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची लवकरच निवड होणे अपेक्षित असून कर्णधारपदासाठी अनुभवी सलामीवीर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात स्पर्धा आहे. तसेच फलंदाज श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट झाल्यास त्याचाही कर्णधार म्हणून विचार केला जाऊ शकेल. या संघात भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल यांसारख्या अनुभवी खेळाडूंसह पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, राहुल चहर यांसारख्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.
या वर्षाच्या अखेरीस टी-२० वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे निवड समितीचे श्रीलंका दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर लक्ष असेल.