आषाढी वारीचा तिढा सुटला; 10 मानाच्या पालख्यांना परवानगी; यंदाही पायी वारी सोहळा नाही

0
779

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासंदर्भातील नियमावली जाहीर केली. यावेळी आषाढी वारीबाबत पुण्यातील बैठकीत चर्चा झाली असून 10 महत्त्वाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं जाहीर केलं. तसेच देहू, आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी 100 वारकऱ्यांना परवानगी देण्यात येणार असून उर्वरित 8 पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 50 वारकऱ्यांना वारीची मुभा देण्यात येणार असल्याचं सांगितलं.

गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारीचा सोहळा साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पायी वारीसाठी यंदाही परवानगी नाकारण्यात आली आहे. इतकंच नाहीतर पायी वारीवरून आता राजकारण करू नये असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील ज्या मनाच्या दहा महत्वाच्या पालखी आहेत त्यांनाच आषाढी वारीसाठी परवानगी देण्यात आली. या पालख्यांना बसमधून जाण्यासाठी २० बसेस देण्यात येणार असल्याचंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही विठुरायाचं मंदीर भाविकांसाठी बंदच असणार आहे. तसेच सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जाणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पालखी सोहळ्यात सहभागी होणार सर्व वारकऱ्यांना वैद्यकीय चाचणी करणं आवश्यक असणार आहे, असंही अजित पवार बोलताना म्हणाले. शासकीय महापूजेचा कार्यक्रम गेल्यावर्षीप्रमाणे सर्व निर्बंध पाळूनच करण्यात येईल, असंही पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मानाच्या 10 पालख्या :

1. संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)

2. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी)

3. संत सोपान काका महाराज (सासवड)

4. संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर)

5. संत तुकाराम महाराज (देहू)

6. संत नामदेव महाराज (पंढरपूर)

7. संत एकनाथ महाराज (पैठण)

8. रुक्मिणी माता (कौडानेपूर -अमरावती)

9. संत निळोबाराय (पिंपळनेर – पारनेर अहमदनगर)

10. संत चांगटेश्वर महाराज (सासवड)

दरम्यान, कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी वारी निर्बंधांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. बस आणि भाविकांची संख्या दुप्पट करीत वारकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा बसमधून पालखी सोहळे अणावे लागणार असून यंदा फक्त 10 पालख्यांना 20 बस दिल्या जाणार आहेत. भाविकांची संख्या देखील दुप्पट करीत वारकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न प्रशासनानं केला आहे. याशिवाय विसाव्यापाशी होणारे प्रतिकत्मक रिंगण करून दिड किलोमीटर पायी चालत येण्यास निर्बंध घालून परवानगी दिली आहे.