सा रे ग म प लिटील चॅम्प’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
525
  • आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत दिसणार वेगळ्या अंदाजात

झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्ष झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच प्रिटी यंग गर्ल आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, लिटिल मॉनिटर मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला यांसारखे उत्कृष्ट गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शो’च्या यापूर्वीच्या सीझनला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते या ‘शो’चा नवीन सीझन घेऊन येत आहेत. त्यामुळे लवकरच हा ‘शो’ छोट्या पडद्यावर सुरु होणार असून अनेक बालगायक आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणार आहेत. तसेच यावेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘शो’चे सूत्रसंचालन करणार आहे.

आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास 12 वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरांत सुरु झाली. यावेळी स्पर्धेत परीक्षक नसून ‘ज्युरी’ असणार आहेत. हे ज्युरी दुसरे कोणी नसून, आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर हे ज्युरी म्हणून असणार आहे.

नवे पर्व ठरणार खास!
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायकांचा शोध हा कार्यक्रम घेतो, त्यामुंळे लहानग्या गायकांसाठी सा रे ग म प पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आलं आहे. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज झाला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या स्वागताची कलाकारांची हि अनोखी पद्धत प्रेक्षकांना खूपच भावली. त्यांच्या या पोस्ट्सवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 24 जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स प्रेक्षकांच्याच्या भेटीस येणार आहे.