आशा स्वयंसेविका म्हणजे काय? त्यांची कार्य काय आहेत?

0
4308

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत “आशा स्वयंसेविका योजना” राबविण्यात येत आहे. आरोग्य हा अत्यंत महत्वपूर्ण घटक असून आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागृकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने “आशा स्वयंसेविका” महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी आशा स्वयंसेविका चा उपयोग होतो. ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये ASHA या मध्यस्थीचे काम करतात. गैर-आदिवासी भागात 1500 लोकसंख्येमागे एक आशा तर आदिवासी भागामध्ये 1000 लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्व पटवून देण्यासाठी त्याचप्रमाणे ताप, लहान-मोठया जखमा यावरील प्राथमिक स्वरुपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, Folic Acid आणि Chloroquin सारख्या इतरही गोळयांचे वाटप करण्याची कामे आशा सेविका मार्फत केली जातात. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याची जबाबदारीही आशा वर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पध्दतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतन/भत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ग्रामीण महिलांना बाळंतपण सुखरुप प्रसुती, स्तनपान, लसीकरण, गर्भप्रतिबंधक उपाययोजना, जननेद्रीयांशी संबंधित जंतुसंसर्ग, लैगिंक संबंधातुन होणारे जंतुसंसर्ग, नवजात अर्भकाची काळजी इ. आरोग्यविषयबाबींसंबंधी मदत व मार्गदर्शन करण्यास “आशा” सदैव तत्पर असतात.
आशा ची ठळक वैशिष्टये

आशा स्वयंसेविकेची निवडप्रक्रियाः-

आदिवासी क्षेत्रः-
आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका किमान आठवी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी व उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात यावे. तिचे वय साधारणतः २० ते ४५ असावे.
आदिवासी क्षेत्रात ग्रामसभा किंवा ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडून ५ आशांची निवड करण्यात येते. त्यापैकी तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून एका आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या स्वाक्षरीने निवडलेल्या आशा स्वयंसेविकेस नियुक्ती पत्र देण्यात येते.
१००० लोकसंख्येस १ या प्रमाणात आशा स्वयंसेविकेची निवड करण्यात येते.
आदिवासी क्षेत्रात ९,५२३ आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा देत आहेत.

बिगर आदिवासी क्षेत्रः-
बिगर आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका किमान १० वी उत्तीर्ण स्थानिक विवाहित महिला असावी व उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य देण्यात यावे. तिचे वय साधारणतः २५ ते ४५ असावे.
बिगर आदिवासी क्षेत्रात ग्राम आरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवक, वैद्यकिय अधिकारी यांची समिती आशा स्वयंसेविका पदाकरिता प्राप्त अर्जांची छाननी करुन ग्रामसभेत ३ अर्ज सादर करेल व ग्रामसभा ३ अर्जांपैकी एका अर्जदार महिलेची निवड आशा स्वयंसेविका म्हणून करेल. तदनंतर ग्रामसभा सदर प्रस्ताव तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडे पाठवेल. तालुका आरोग्य अधिकारी सदर महिलेस आशा स्वयंसेविका म्हणून नियुक्ती पत्र देईल्.
१५०० लोकसंख्येस १ या प्रमाणात आशा स्वयंसेविकांची निवड करण्यात येते.
बिगर आदिवासी क्षेत्रात ४९,७६६ आशा स्वयंसेविका आरोग्य सेवा देत आहेत.

“आशा स्वयंसेविका” भूमिका व जबाबदा-याः-
आरोग्य संस्थेतील प्रसुतीमध्ये वाढ करणे.
मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग उपचारासाठी मदत
मोफत संदर्भ सेवेचा प्रचार
कुटुंब कल्याण प्रचार, गर्भनिरोधकाचे वाटप
साध्या (किरकोळ) आजारावर उपचार उदा. ताप, खोकला यावर औषधी संचातील औषधांचा वापर
माता व बाल आरोग्य विषयी प्रबोधन उदा. प्रसुतीपूर्व तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या, आहार इत्यादी.
जन्म व मृत्यु नोंदणीमध्ये मदत

प्रशिक्षण

ग्रामसभेद्वारा निवड झाल्यानंतर व तालुका आरोग्य अधिका-यामार्फत नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर आशा स्वयंसेविका प्रशिक्षणासाठी पात्र ठरते. २. प्रशिक्षण हे ७+४+४+४+४ असे एकुण २३ दिवस अशा प्रकारे ५ सत्रात विभागलेले असते. ३. प्रथम ७ दिवसांचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर ASHA ला तिच्या कार्यकुशलतेवर आधारित प्रोत्साहनपर वेतन/भत्ते प्राप्त होत असतात. ४. प्रशिक्षणाला हजर राहील्यानंतरच आशा प्रोत्साहनपर वेतन/भत्ता प्राप्तीसाठी पात्र ठरते.