जगातला सर्वात आनंदी लोकांचा देश फिनलँड

0
299

भ्रष्टाचारमुक्त व्यवहार हा फिनलंडच्या प्रगतीचा गाभा आहे. ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या जागतिक स्तरावर भ्रष्टाचारविरोधी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने फिनलंडला सर्वांत भ्रष्टाचारमुक्त देश म्हणून अव्वल क्रमांक दिला आहे. सर्वात आनंदी देश म्हणूनही फिनलँड ओळखला जातो.

फिनलंडचे क्षेत्रफळ ३,३८,१४५ किमी असून १९१७ पर्यंत हा देश रशियन अमलाखाली होता. रशियन क्रांतीनंतर त्याला स्वातंत्र मिळाले. १९०६ सालापासून येथे महिला आणि पुरुष दोघांना मतदानाचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. लैगिक समानता स्वीकारणारा हा जगातील पहिला देश आहे. फिनलंड हा देश यंदा सलग तिसऱ्या वर्षी ‘आनंदी लोकांचा देश’ ठरला आहे. ‘आनंदी देशांमध्ये एकमेकांप्रती स्नेहभाव आणि विश्वास असतो. हा विश्वास कठीण परिस्थितीचा भार कमी करण्यास मदत करतो,’ असे ‘वर्ल्ड हॅपीनेस’ नावाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आनंदाचे उत्स्फूर्त प्रदर्शन करण्याऐवजी, या देशातील नागरिक शांतता आणि एकांत पसंत करतात. फिनलंडमधील नागरिकांची जीवनशैली आदर्श, उत्कृष्ट मानली जाते. सुरक्षितता आणि सार्वजनिक सेवांमध्येही हा देश आघाडीवर आहे. सामाजिक विषमता आणि दारिद्र्य यांचे येथे अगदीच नणग्य अस्तित्व आहे.

फिनिश लोक शिक्षण क्षेत्रात खूपच अग्रेसर आहेत. या चिमुकल्या देशात जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षणव्यवस्था आहे. येथील शैक्षणिक प्रयोग फार महत्त्वाचे मानले जातात. कागद-पेनाला सोडचिठ्ठी देऊन, लिहिण्याऐवजी मुलांना थेट की-बोर्डवर टायपिंगचे धडे गिरवायला शिकविण्याचा धाडसी निर्णय त्यांनी यशस्वीपणे अमलात आणला आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थीकेंद्री शिक्षणाचा वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे.

खरोखरच गेल्या दशकात टेलिकम्युनिकेशन आणि इतर औद्योगिक क्षेत्रांत फिनलंडने जपानच्या बरोबरीने मुसंडी मारली. विश्वप्रसिद्ध नोकिया हा ब्रँड जपानचा नसून, फिनलंडचा आहे, हे सांगितल्यास बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. अति उत्तरेकडील बर्फाच्छादित स्वीडन, नॉर्वे, उत्तर रशिया व इस्टोनिया या देशांच्या कुशीत फिनलंड वसलेला आहे. यांना ‘स्कँडेनेव्हियन कंट्रीज’ असेही म्हणतात. उत्तर ध्रुवावरील सर्व मोहिमांचा फिनलंड हा मुख्य तळ असतो. वर्षाचे बाराही महिने थंडी आणि ऐन हिवाळ्यात येथे दिवसाही अंधार असतो. सूर्यदर्शन दुर्मीळ होते.

एवढी थंडी असूनही फिनिश लोक बिलकुल आळसावलेले नसतात. उलट अत्यंत कामसू व मेहनती वृत्तीने त्यांनी आपल्या चिमुकल्या देशाला प्रगतीपथावर नेले आहे. कोणालाही हार न जाणाऱ्या या चैतन्यमयी आनंदी वृत्तीला फिनिश भाषेत ‘सिसु’ असे म्हणतात. फिनलंडच्या एकूण निर्यातीपैकी २५ टक्के हिस्सा एकट्या नोकिया कंपनीचा आहे; परंतु एकाच कंपनीवर निर्भर राहणे दूर पल्ल्याच्या दृष्टीने योग्य नाही, हे वेळीच ओळखून फिनलंडमधील द्रष्ट्या उद्योजकांनी इतर क्षेत्रातही पावले रोवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच पेपर आणि पेपरबोर्ड उत्पादने, वन्य उत्पादने आणि पर्यावरण ऊर्जा या क्षेत्रांतही फिनिश कंपन्या चांगल्या रीतीने वाटचाल करताना दिसतात.

ख्रिसमसच्या दिवशी सांताक्लॉज आला, की फिनलंडची आठवण होते; कारण सांताक्लॉजची उत्पत्ती, प्रारंभ फिनलंडमधील आहे. त्याचे वास्तव्यही येथेच असल्याचे मानले जाते. सर्व मुलांना आवडणारा, भेटी देणारा ऐतिहासिक संतपुरुष सेंट निकोलासचे नाव पुढे सांताक्लॉज असे झाले. फिनलंडच्या लॅपलँडमधील आर्क्टिक सर्कल या परगण्यातील सांताक्लॉज व्हिलेज येथे तो राहतो. ते त्याचे अधिकृत निवासस्थान समजले जाते. हे स्कँडेनेव्हियामधील सर्वांत लाडके पर्यटनस्थळ आहे. सांताला भेटण्यासाठी व त्याच्याकडून भेटी मिळविण्यासाठी हजारो पर्यटक दर वर्षी फिनलंडची सहल करत असतात.