राज्यात सर्वात मोठी महापालिका म्हणून पुण्याचा समावेश

0
323

पुणे भारी की मुंबई? असा वाद अनेकदा मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये रंगलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वादासाठी त्यांना कोणतीही कारणं पुरेशी असतात. असं असताना आता पुण्याने (Pune) मात्र एक गोष्टीत आता मुंबईला (Mumbai) देखील मागे टाकलं आहे. ते म्हणजे आता पुणे महापालिकेने मुंबई पालिकेला मागे टाकत राज्यातील सर्वात मोठी महापालिका होण्याचा मान पटकवला आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश करण्यासाठी मागील वर्षांपासून हालचाली सुरु होत्या. त्याला आता मुहूर्तमेढ मिळाली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे पुणे महापालिकेचा विस्तार झाला आहे.

23 गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर आता महापालिकेची हद्द ही 485 चौ. किलोमीटर एवढी झाली असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. तर महसूल विभागाच्या मते हे क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर एवढं झालं आहे.

34 गावे महापालिकेत समाविष्ट केली जावीत यासाठी उच्च न्यायालयात याचिका नागरी कृती समितीकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर 2017 साली कोर्टाने निकाल दिल्यानंतर 11 गावांचा सुरुवातीला समावेश करण्यात आला होता. पण इतर 23 गावांचा समावेश हा वेगवेगळ्या टप्प्यात करण्यात येईल असा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता.

ज्यासाठी सरकारने हायकोर्टाकडे 3 वर्षांचा कालावधी मागून घेतला होता. ज्यानुसार आता उर्वरित 23 गावं ही महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे या 23 गावांचा महापालिकेत समावेश लवकर व्हावा यासाठी आग्रही होते. अखेर आता राज्य शासनाने त्यावर अधिसूचना काढून हा निर्णय अंमलात आणला आहे.

पाहा कोणकोणत्या गावांचा पुणे महापालिकेत करण्यात आला आहे समावेश:

खडकवासला, जांभूळवाडी, वाघोली, कोळेवाडी, म्हाळुंगे, सूस, वडाचीवाडी, किरकटवाडी, शेवाळेवाडी, कोंढवे धावडे, कोपरे, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी,नांदोशी, भिलारेवाडी, सणसनगर, मांगडेवाडी, पिसोळी, गुजर निंबाळकरवाडी, नांदेड, बावधन (बुद्रुक) आणि मांजरी (बु.) या गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.