जपानची राजधानी टोकियोत येत्या 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होत आहे. पण त्यापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून टोकियोमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे जपानच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
साथीच्या आजारामुळे वर्षभरासाठी पुढे ढकलली गेलेली ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दरम्यान, स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवडे आधी जपानमध्ये कोरोना विषाणूमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजधानीत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियो शहरात आणीबाणीची स्थिती लागू होईल. बुधवारी तज्ज्ञांशी झालेल्या बैठकीत सरकारी अधिकाऱ्यांनी येत्या सोमवार ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव दिला होता. 23 जुलै ते 8 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण आणीबाणीच्या परिस्थितीतच ऑलिम्पिक खेळांचं आयोजन होणार असून स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना मैदानात हजर राहण्याची परवानगी मिळणार नाही.
करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.
टॉर्च रिलेही थांबवण्यात आली
कोरोनाच्या संकटामुळे टोक्योच्या सार्वजनिक ठिकाणांवर सुरु असलेली ऑलम्पिक टॉर्च रिले थांबवण्यात आली आहे. टोकियोमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ऑलम्पिक खेळांपासून कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने टॉर्च रिले सार्वजनिक ठिकाणी समाप्त करण्याचा निर्णय घेतला. जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार टोकियोच्या खासकी फ्लेम लाइटिंग समारंभात टॉर्च रिलेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.