प्रेमाची नवीन परिभाषा : अजूनही बरसात आहे’ ही मालिका आली आहे प्रेक्षकांच्या भेटीला

0
488

मुक्ता बर्वे आण उमेश कामत ही जोडी छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा दिसायला सज्ज झाली आहे. दोघंही ‘अजूनही बरसात आहे’ या नव्या कोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ही मालिका सोनी मराठीवरून प्रसारित होत असून ज्या मालिकेची उत्सुकता सर्वांनी होती त्या मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे. एखादे नाते संपले तरी प्रेम संपत नाही असे म्हटले जाते, याच ओळीला साजेशी असे या मालिकेचे कथानक असणार आहे.

मुंबई-पुणे-मुंबई’, ‘डबल सीट’, ‘जोगवा’ या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली. उमेश कामत हा तर तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानीही ‘टाईम प्लिज’, ‘लग्न पाहावे करून’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मुक्ता आणि उमेश यांनी लग्न पाहावे करून या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे या दोघांचा आपला असा एक खास चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतताना बघून चाहते जाम खुश आहेत. सध्या सोशल मीडियावर या प्रोमोचं आणि मालिकेच्या विषयाचं कौतुक केलं जात आहे.

सध्या या मालिकेची चर्चा तर आहेच पण त्यासोबतच चर्चा आहे ती या मालिकेच्या शीर्षक गीताची. ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेच्या शीर्षक गीतासाठी देवकी पंडित आणि स्वप्नील बांदोडकर यांनी आवाज दिला असून अशोक पत्की यांनी ते संगीतबद्ध केलं आहे.

दररोज सोमवार ते शनिवार ‘अजूनही बरसात आहे’ ही नवीन मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. तर तुम्हाला जर खरेच प्रेमात पडायचे असेल आणि प्रेमाची नवीन परिभाषा जाणून घ्यायची असेल तर ही मालिका नक्की पाहावी लागेल.