टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या खेळाडूंचे जाणार इतिहासातील सर्वात मोठे पथक

0
415

यंदा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिकचा थरार रंगणार आहे. ही स्पर्धा जपानची राजधानी टोकियो येथे आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या 119 खेळाडूंसह एकूण 228 सदस्यीय पथक जपानची राजधानी टोकियोला पाठवले जाणार आहे. या पथकामध्ये 119 खेळाडूंपैकी 67 पुरुष आणि 52 महिलांचा सहभाग आहे. कोणत्याही ऑलिम्पिकसाठी जाणारे हे सर्वात मोठे भारतीय पथक असणार आहे. भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांनी याबद्दल माहिती दिली आहे. भारतीय खेळाडू एकूण 85 स्पर्धांमध्ये सहभाग घेणार आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये जाणार असलेले भारताच्या खेळाडूंचे हे सर्वात मोठे पथक असणार आहे. यापूर्वी रियो ऑलिंपिक 2016 मध्ये भारताच्या एकूण 118 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. बात्रा पुढे म्हणाले की, ‘टोकियो ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले पथक 17 जुलैला टोकियोला रवाना होणार आहे. यामध्ये एकूण 90 खेळाडू आणि अधिकारी असणार आहेत.’

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन 23 जुलै पासून ते 8 ऑगस्ट दरम्यान केले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे स्पर्धेदरम्यान स्टेडियममध्ये प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी दिलेली नाही. ऑलिंपिकच्या या स्पर्धेचे आयोजन आपत्कालीन उपाययोजनांअंतर्गत केले जाणार आहे. ही आपत्कालीन उपाययोजना 22 ऑगस्टपर्यंत चालेल.

पंतप्रधानांचा खेळाडूंशी संवाद

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी संवाद साधला. तुम्ही जेव्हा इतक्या मोठ्या स्तरावर पोहोचता, तेव्हा तुमच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा असतात. आगामी ऑलिम्पिकमध्ये तुम्ही देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी कराल याची खात्री असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.  मेरी कोम (बॉक्सिंग), सानिया मिर्झा (टेनिस), दीपिका कुमारी (तिरंदाजी), नीरज चोप्रा (भालाफेक) आणि द्युती चंद (धावणे) आदी खेळाडूंनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या चर्चा सत्रात भाग घेतला होता.