ग्रामसेवक म्हणजे काय? ग्रामसेवकाचे अधिकार काय आहेत?

0
2988

ग्रामीण व्यवस्थेचा जो कणा समजला जातो ते म्हणजे ग्रामपंचायत. याच ग्रामपंचायतचा महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे ग्रामसेवक. चला तर आपण ग्रामसेवकाची सविस्तर माहिती घेऊया

ग्रामसेवकची नेमणूक कशासाठी असते?

सर्व प्रथम ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ग्रामसेवक असे म्हणतात. ग्रामपंचायतीचा काराभर पाहण्यायसाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंयातीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व काराभारावर त्याचे नियंत्रण असते. ग्रामसेवकाची निवड जिल्हाधिकाऱ्यामार्फत होते, व त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. हा जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याचे वेतन जिल्हा निधीतून होते.त्याच्यावर गटविकास अधिकारी यांचे नजीकचे नियंत्रण असते. काहीवेळा ग्रामसेवकाकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतींची जवाबदारी सोपविण्यात येते.

ग्रामसेवक होण्यासाठी काही पात्रता ठरविलेल्या असतात बरं का

ग्रामसेवक पात्रता निकष:

ग्रामसेवक पदासाठी 60 गुणांनी बारावी पास किंवा MCVC शाखेतून बारावी पास, कृषी पदविका किंवा कृषी पदवी, BSW म्हणजे समाज कल्याण पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी,B.tech पदवी

• MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण

• परीक्षा देण्यासाठी वय 18 ते 38 दरम्यान

ग्रामसेवक परीक्षा स्वरूप

• ग्रामसेवक पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडून परीक्षा घेतली जाते. परीक्षा एकूण 200 गुणांची असते.

• परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नासाठी दोन गुण असतात.

• कृषी- 80 गुणांसाठी 40 प्रश्न

• इंग्रजी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• मराठी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• बुद्धिमत्ता चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• सामान्य ज्ञान चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

महाराष्ट्रातला ग्रामसेवक वयाच्या ५८ व्या वर्षी पदावरून निवृत्त होत असतो.

ग्रामसेवक नक्की कशाप्रकारे आणि कोणती कामे करतात ते आपण आता पाहणार आहोत.

 

प्रशासन

 

  • ग्रामपंचायत कडील सर्वप्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे.
  • महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेखे वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे.
  • पंचायतीने ठरवून दिल्यानंतर ग्रामसभा, मासिक सभा बो‍लविणे, त्यांच्या नोटिसाकाढून संबंधितांना देणे, सभेचा कार्यवृतांत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पूर्तता करणे, हे काम पंचायतीच्या सहकार्याने करावे.
  • शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर (वसूल करण्‍याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त‍ झाल्यायनंतर) व फी यांची वसूली करणे, प्रत्येकी चार वर्षांनी कराची आकारणी करुन २५ टक्के वाढ सुचविणे.
  • ग्रामपंचायतीकडील लेखा परीक्षणांत केलेल्या, आक्षेपांना उत्तर देणे.
  • ग्रामपंचायत हद्दीतील जमिन, रस्ते, इमारती, पडसर जागा, व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.
  • जन्म, मृत्यु, उपजत मृत्यु, विवानोंदणी करणे.
  • ग्रामपंचायत पातळीवर शासकीय, निमशासकीय, कर्मचा-यांना आठावडयातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीणे समन्वय साधून आवश्याक ती कार्यवाही करणे.
  • सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर इतर वेळी कायदेविषयक सल्ला देऊन, आवश्यकता असल्यास आपले मत नोंदविणे.
  • ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांची उलंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकरी / गट विकास अधिकारी यांना विहीत मुदतीत सादर करणे.
  • ग्रामसेवकांना ग्रामीण भागातील वेगवेगळ्या योजनांवर आणि वेगवगेळ्या विषयांवर काम करावी लागतात.
  • शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती प्राप्त करुन ती ग्रामसभा, मासिक सभा व इतर सार्वजनिक सभामार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांनादेणे, दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.

कल्याणकरी योजना

  1. महिला व बालकल्याण, समाजकल्याण, साक्षरता प्रसार, अंधश्रध्दांनिर्मुलन कायदेवषियक सहाय व सल्ला देणे. इ. योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे. तसेच या योजनांची अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे
  2. शुध्द पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुध्दीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा करणे, पाणीवाटपाचे नियोजन, देखभाल व दुरुस्तीसाठी होणा-या खर्चा इतकी पाणीपट्टी बसविणे, त्या बाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्या‍वर पंचायतीने केलेल्या आकारणीनुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे.
  3. पूर, दुष्काळ, भूकंप, टोळधाड, टंचाई, साथरोग इत्यादी नैसर्गीक आपत्ती उदभवल्यास त्याबाबत त्वरीत संबधीत खात्याला कळविणे व ग्रामपंचायतीने आरोग्यखात्याच्‍या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे.