Khel Ratna Award: खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं, आता राजीव गांधींऐवजी मेजर ध्यानचंद यांच्या नावाने पुरस्कार

0
483

सध्या देशभरात टोकियो ऑल्मिपिकचे वारे वाहत आहेत. अशा उत्साहाच्या परिस्थिती केंद्र सरकारने खेलरत्न पुरस्कारासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या पुरस्काराचं नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. यानुसार आता राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलं जावं यासाठी आपल्या देशभरातून लोकांच्या विनंती येत होत्या असं मोदींनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये सांगितलं आहे. “मला देशभरातील नागरिकांनी अनेकदा खेलरत्न पुरस्कार मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देण्यात यावा अशी मागणी केली. मी त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्याचे आभार मानतो. त्यांच्या भावनांचा आदर करुन यापुढे खेलरत्न पुर्सकारांचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावाने ओळखला जाईल,” असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

खेलरत्न पुरस्कार काय आहे?

१९९१-१९९२ मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली होती. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे हा पुरस्कार मिळवणारे पहिले खेळाडू ठरले होते. याशिवाय आतापर्यंत टेनिसपटू लिअँडर पेस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॅडमिंटनपटू पुलेला गोपिचंद, नेमबाज अभिनव बिंद्रा, अ‍ॅथलेट अंजू बॉबी जॉर्ज, बॉक्सिंगपटू मेरी कोम, क्रिकेट रोहीत शर्मा, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट, पॅरालिम्पिकपटू एम. थंगवेलू आणि महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. या पुरस्कारासोबत २५ लाखांचे रोख बक्षीस देण्यात येतं.

मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीतील योगदान
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जातं. मेजर ध्यानचंद यांचं भारतीय हॉकीमध्ये महत्वाचं योगदान राहिलं आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. त्यांनी बर्लिन येथे 1936 मध्ये अखेरचं ऑलम्पिक खेळलंय होतं. अमस्टर्डम, लॉस एंजेलिस आणि बर्लिन ऑल्मपिक मिळून ध्यानचंद यांनी 39 गोल केले होते.

मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेल रत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये 1928 अमस्टर्डम, 1932 लॉस एंजेलिस आणि 1936 बर्लिनमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं.